नागपूर : शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आणि प्रॉपर्टी डिलर अंकुश कडू (५४) यांची हत्या करण्यासाठी एका प्रॉपर्टी डिलर महिलेने १० लाखांत सुपारी देऊन खून केला. व्यावसायिक स्पर्धा आणि अनैतिक संबंधातून हे हत्याकांड घडल्याची चर्चा आहे. १० ते १२ आरोपींनी सुपारी घेऊन शनिवारी १९ एप्रिलला मानकापुरात भरचौकात अंकुश यांची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणाचा ३६ तासांत छडा लावत मारेकऱ्यांना अटक केली.

राहुल वाघ रा. कळमना, संगीता सहारे रा. कपीलनगर, आकाश सहारे रा. कपीलनगर, अश्विन खोळगे रा. कपीलनगर, राजेश बोकडे रा. कळमना, विलास नंदनवार, रा. कळमना, धनंजय उर्फ शिवम काटेकर (१९) रा. कळमना आणि अशोक उर्फ लाला मिश्रा (५५) रा. कपीलनगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात आणखी चार विधीसंघर्ष बालकांचा समावेश आहे.

शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अंकुश भूखंड व्यवसायी होते. त्यांनी शेतीवर भूखंड पाडून विक्री केली. त्यांचा व्यवसाय तेजीत होता. आरोपी संगीता सहारे हीसुध्दा भूखंड व्यवसायी आहे. दोघांचाही एकाच परिसरात व्यवसाय होता. अंकुशचा व्यवसाय तेजीत असल्याने संगीताला अनेक ठिकाणी फटका बसत होता. त्यामुळे संगीताने अंकुशचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कळमना येथील रहिवासी आरोपी आकाश आणि राजा या दोघांना हाताशी धरले. त्यांना अंकुशच्या खुनाची दहा लाखांत सुपारी दिली. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना पाच लाख रुपये अग्रीमही दिले. रक्कम मिळताच आकाश आणि राजाने इतर आरोपींना गोळा केले. त्यांना हत्येची योजना समजावून सांगितली. काही दिवस त्यांनी अंकुशच्या हालचालीवर लक्ष ठेवले तसेच तो ये-जा करीत असलेल्या मार्गावर पाळत ठेवली.

रस्त्यात अडवून केला खून

१९ एप्रिलच्या सायंकाळी अंकुश हे मित्राच्या घरी गेले. मित्रासोबत तासभर गप्पा मारल्या. ते म्हाडा चौक मार्गाने घरी परतेल, अशी आरोपींना खात्री होती. त्यामुळे आकाश आणि राजासह इतरही आरोपी चौकात ठाम मांडून होते. अंकुश सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास दुचाकीने घरी जात असताना मुख्य आरोपी आकाश आणि राजाने त्यांना रस्त्यातच अडविले. दुचाकीसह त्यांना खाली पाडताच दबा धरून बसलेले इतरही आरोपी धावत गेले आणि सर्वांनी मिळून चाकूने वार करून अंकुश यांची हत्या केली.

३६ तासांत आरोपींना अटक

या प्रकरणी अंकुशचा मुलगा फिर्यादी प्रथमेश कडू (२५) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. हत्येची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्या आधारावर पोलिसांनी आरोपींची ओळख पटविली. या घटनेचा तपास कपीलनगर पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक संदीप बुवा व त्यांचे पथक करीत होते. सर्व मारेकऱ्यांना ठिकठिकाणाहून अटक केली. त्या सर्वांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनात संदीप बुवा व त्यांचे पथक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे व त्यांच्या पथकाने केली.