नागपूर : अवघ्या १९ व्या वर्षांच्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या जागतिक स्पर्धेत महिला विश्वचषकाचा किताब मिळवला. दिव्या वयाच्या पाचव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळत असून मागील १४ वर्षांपासून सातत्याने विजयाला गवसणी घालत आहे. तीन दिवस चाललेल्या अंतिम फेरीत दिव्याने संयम तसेच आक्रमकता यांचा उत्तम समतोल साधत अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला ६४ चौरसाच्या खेळात पराभूत केले.
दिव्याने २०१० मध्ये केवळ पाचव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. तिचे पालक डॉ. जितेंद्र आणि नम्रता यांनी तिला जवळच्या बुद्धिबळ अकादमीत घातले. नागपूरच्या शंकरनगर येथील त्यांच्या वसाहतीत बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि बुद्धिबळ असे तीन खेळ शिकवले जात होते. दिव्याची मोठी बहीण आर्या बास्केटबॉल आणि बॅडमिंटन खेळत होती. दिव्याला हळूहळू या बुद्धिबळाची आवड निर्माण झाली आणि दोन वर्षांतच, जुलै २०१२ मध्ये पुदुचेरी येथे झालेल्या स्पर्धेत तिने सात वर्षांखालील पहिले राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. २०१३ मध्ये इराणमध्ये झालेल्या आठ वर्षांखालील आशियाई स्पर्धेत तिने विजेतेपद मिळवत आंतरराष्ट्रीय छाप सोडली. त्यानंतर ती पुढील वर्षी वर्ल्ड युथ चॅम्पियनशिपसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र ठरली. २०१४ मध्ये, वयाच्या अवघ्या आठ वर्षे आणि पाच महिन्यांत, तिने दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे १० वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. तेव्हापासून तिने भारताचे ४० वेळा प्रतिनिधित्व केले असून, त्यात तिने ३५ वेळा पदक मिळवले आहे. यात २३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे.
दिव्याच्या विजयानंतर तिच्या शंकरनगर येथील निवासस्थानी आनंदाचे वातावरण होते. दिव्याचे आई व वडील दोघेही डॉक्टर आहेत. दिव्याला घरातूनच बुद्धिबळाचा वारसा लाभला. दिव्याचे वडील, काका तसेच दिव्याचे आजोबाही बुद्धिबळ खेळायचे. दिव्याची काकू डॉ. स्मिता देशमुख यांनी घरी मिठाई वाटून आनंद साजरा केला. दिव्याच्या यशाचा आनंद आहे. या यशामागे अनेक वर्षांचे कष्ट आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आजोबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू
दिव्या देशमुख हिचा जन्म नागपूरचा असला, तरी तिचे अमरावतीशी विशेष नाते आहे. अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू दिवंगत डॉ. के.जी. देशमुख यांची ती नात आहे. त्यांचे मूळगाव हे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (काटपूर) असून दिव्या हिचे वडील नागपूर येथे स्थायिक झाले आहेत. डॉ. के.जी. देशमुख हे अमरावती विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते १९८३ ते १९९२ पर्यंत त्यांनी कुलगुरू म्हणून कार्य केले.