नागपूर: मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुंडांना कायद्याचा धाक उरला आहे, का अशी शंका याव्यात अशा घटना रोज उपराजधानीत घडत आहेत. असाच प्रकार बुधवारी चव्हाट्यावर आला. ऑटो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका गरीब तरुणाला धंदा करायचा असेल तर खंडणी द्यावी लागेल, अन्यथा हातपाय तोडू अशी धमकी एका खंडणीबहाद्दर गुंडाने दिली.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे शहर गुंडांची राजधानी होतेय का अशी परिस्थिती आहे. यशोधरानगर पोलिसांनी या खंडणीखोर गुंडाला बेड्या ठोकल्या असल्या तरी,कायदा सुव्यवस्थेसमोरचा प्रश्न एरणीवर येऊन उभा आहे. समिर अहमद उर्फ शेरा जाकीर अहमद असे या खंडणीखोर गुंडाचे नाव आहे. समिरने संजयबाग कॉलनीतील आलीम शेख आबीद शेख या ऑटो चालकाला ऑटो स्टॅंडवर धमकी देऊन मारहाण केली. यानंतर स्टॅंडवर ऑटो लावून व्यवसाय करायचा असेल तर तू मला हप्ता दिला पाहिजेस अन्यथा तुझे हातपाय तोडू अशी धमकी दिली. भेदरलेल्या आलीम शेखने यशोधरानगर पोलिसठाणे गाठत फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी खंडणीबदाद्दर समिर अहमद शेख याला वस्तीतून उचलत बेड्या ठोकल्या.
अल्पवयीन मुलीचा गर्भपात
खंडणीची घटना ताजी असतानाच एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर शारीरिक अत्याचार करीत तरुणाने तिला गर्भवती केले. मुलगी पोटूशी असल्यानंतर त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या. प्रकृती बिघडण्याने मुलगी मेयोत उपचाराला पोचली आणि या अल्वयीनावरील अत्याचाराचे बिंग फुटले. गर्भपात झालेली मुलगी अल्पवयीन असल्याने कळमना पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करीत निलेश सहारे या तरुणाला अटक केली.