नागपूर : शहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आणि गुलशन प्लाझाचे मालक जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी नादिरा यांचा गेल्या गुरुवारी इटली येथे झालेल्या रस्ता अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे अख्तर कुटुंबावर अनपेक्षितरित्या दुःखाचे आभाळ कोसळले आहे. सिव्हिल लाईन येथील त्यांच्या निवासस्थानी शुकशुकाट पसरला असून अख्तर दाम्पत्याचे पार्थिव शरीर नागपुरात येण्यास आणखी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.

या अपघातानंतर इटली येथील कायदेशीर प्रक्रियाच अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सोमवारी देखील अख्तर दाम्पत्यांचे मृतदेह परराष्ट्र मंत्रालय आणि नातेवाईकांकडे सूपूर्द करण्यात आले नाहीत. या प्रक्रियेला आणखी किमान दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे जोवर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोवर पार्थिव शरीर नागपुरात पोचणे अशक्य आहे.

यासाठी अख्तर यांचे नातेवाईक आणि मध्य प्रदेश पोलिस दलातून उप अधिक्षक म्हणून सेवा निवृत्त झालेले इक्बाल अख्तर आणि जावेद अख्तर यांचे मोठे बंधू स्वतः परराष्ट्रमंत्रालयाच्या संपर्कात आहेत. येत्या दोन दिवसांत आंततराष्ट्रीय स्तरावत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दोघांचेही पार्थिव शरीर नातेवाईकांकडे सुपूर्द केले जाईल. त्यामुळे इटली येथील अपघातात दगावलेले जावेद आणि त्यांच्या पत्नी नादिरा यांचे मृतदेह नागपुरात पोचण्यास आणखी दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो. या घडामोडीत कुटुंबासह इटली येथे पर्यटनासाठी गेलेले जावेद आणि त्यांच्या पत्नी नादिरा यांच्या सोबत त्यांच्या आरजू (२४) आणि शिफा या दोन मुलींवर इटली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्यांचा आणखी एक मुलगा जाजेल (१४) याच्यावरही दुसऱ्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांची रुग्णालयातून सुटी होण्यासही आणखी किमान १४ ते १५ दिवस लागू शकतात. त्यामुळे तुर्तास हे तिघे देखील नागपुरात पोहचू शकलेले नाहीत..