नागपूर : शहरातील हिंगणा परिसरातून नुकताच एक हृदयस्पर्शी प्रकार समोर आला आहे. स्थानिक सर्पमित्र हर्षल शेंडे यांना सकाळी एक ‘रेस्क्यू कॉल’ आला. त्यांना सांगण्यात आले होते की, एक साप पाण्याच्या ड्रमखाली अडकला असून हालचाल करणे अशक्य झाले आहे. हर्षल शेंडे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ड्रम एका बाजूला सारताच त्यांनी पाहिसे की साप पूर्णतः अशक्त, मृतप्राय अवस्थेत पडला आहे.

तातडीने सापाला पाणी पाजण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जवळपास दीर्घकाळपर्यंत सीपीआर (हृदयविकार उपचार प्रक्रिया) देण्यात आली, तरीही काही परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे सापाचा मृत्यू झाल्याचे समजून त्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आणखी एक प्रयत्न करुनच पाहूया असे म्हणून हर्षल शेंडे यांनी देवाचे नाव घेऊन पुन्हा एकदा सीपीआर सुरु केला. आणि चमत्कार घडला.

सापामध्ये किंचित हालचाल जाणवली. त्यामुळे लगेचच त्याला पाणी पाजण्यात आले आणि काही मिनिटांतच तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचे दिसून आले. साप पूर्णपणे शुद्धीवर आल्यानंतर आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले. हा साप कॉमन कुकरी प्रजातीचा होता आणि ही प्रजाती बिनविषारी असल्याचे सर्पमित्र हर्षल शेंडे यांनी सांगितले.

सीपीआर म्हणजे कार्डिओ-पल्मोनरी रिसुसिटेशन. ज्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके बंद झाले आहेत अशा व्यक्तीच्या मेंदूमध्ये तात्पुरते ऑक्सिजनयुक्त रक्त प्रसारित करणे ही आपत्कालीन उपचार आहे. सीपीआर हृदयविकाराच्या झटक्यामध्ये किंवा बुडण्याच्या जवळ असलेल्या प्रकरणांमध्ये जीवन वाचवणारे सिद्ध होते, जेथे पीडितांच्या हृदयाचे ठोके थांबले आहेत आणि त्यांना त्वरित उपचारांची आवश्यकता आहे. एखाद्याचा जीव धोक्यात असताना कौशल्याची गरज नसते. मूलभूत ज्ञान पुरेसे आहे. सीपीआरचे ज्ञान असल्यास माणसाचा जीव वाचवता येऊ शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती प्रतिसाद देत नाही, श्वास घेत नाही किंवा असामान्यपणे श्वास घेते, तेव्हा सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन) दिला जातो.

जेव्हा एखाद्याचा श्वास थांबतो (रेस्पिरेटरी अरेस्ट) किंवा हृदय धडधडणे थांबते (कार्डियाक अरेस्ट), तेव्हा सीपीआरमुळे मेंदू आणि महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा सुरू ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे जीव वाचू शकतो. ही पद्धत प्रामुख्याने माणसांसाठी वापरली जाते, पण सर्पमित्र हर्षल शेंडे यांनी चक्क सापाला सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवला.