नागपूर : समाज माध्यमातून ओळख झालेल्या काही युवतींनी एका २४ वर्षाच्या युवकाला जाळ्यात ओढून त्याला अश्लिल छायाचित्र पाठवले. त्यालाही फोटो पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतर नग्न अवस्थेतील छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची भीती दाखवून पैसे देण्यास भाग पाडले. घाबरलेल्या युवकाला बदनामीच्या भीतीपुढे काही सुचेनासे झाले. मागितलेले पैसे दिल्यास प्रकरण थांबेल म्हणून तो पैसे देत राहीला, अवघ्या चार महिन्यांत त्याने आरोपींना ५० लाख रुपये दिले. त्यानंतरही त्याला धमकाविणे सुरूच असल्याने अखेर युवकाचा नाईलाज झाला आणि सर्व प्रकार पुढे आला.

सोनेगाव पोलीस ठाणे हद्दीत राहणारा मंगेश (काल्पनिक नाव) हा खासगी काम करतो. मोबाईल हाताळत असताना ५ जानेवारीला त्याची एका युवतीशी ओळख झाली. तिने मंगेशला व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संदेश पाठवत गृपशी जोडले. सुरूवातीला युवतींनी मंगेशला विविध सेवा (सर्व्हीस) बाबत माहिती दिली. अचानक युवती ही त्याला ‘न्यूड व्हिडीओ कॉल’ करायला लागली. अश्लिल संभाषण करू लागली. या सर्व घटना मंगेशसोबत अचानक घडत होत्या. त्याला काही सुचायच्या आत वेगवेगळ्या मुली ‘न्यूड व्हिडीओ कॉल’ करू लागल्या. हळूहळू मंगेश देखील त्यात वाहवत गेला. संभाषणाला उत्तर देऊ लागला आणि जाळ्यात अडकत गेला.

त्याला न्यूड अवस्थेतेतील छायाचित्रे पाठवायच्या आणि त्यालाही तसेच छायाचित्र मागायच्या. मंगेशनेही असेच काही छायाचित्र पाठविले. छायाचित्र हाती लागल्यानंतर तरुणींनी खरे रुप दाखवले. विविध अडचणी सांगून आरोपी युवती मंगेशकडून पैसे मागायच्या. पैसे न दिल्यास छायाचित्र समाज माध्यमांवर टाकून बदनामी करण्याची धमक्या देत होत्या. घाबरलेल्या मंगेशला आई-वडिलांना कळेल तर काय होईल?, बाहेर हा प्रकार कळला तर? अशी भीती वाटू लागली. एकदाच मागितलेले पैसे देऊन टाकायचे आणि मोकळे व्हायचे असा निर्णय त्याने घेतला. सुरूवातीला मागितलेली रक्कम दिली. परंतु, तरुणी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. वेळोवेळी त्याला धमकावत त्या पैसे उकळायच्या. अवघ्या चार महिन्यांत त्यांनी मंगेशकडून ५० लाख उकळले. पुन्हा पैसे देण्यास मंगेशचा नाईलाज झाल्याने त्याने वडिलांना सर्व प्रकार सांगिल्यानंतर वडिलांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध कलम ३१८, ३५१ (४), ३(५), सहकलम ६६ (ड) आयटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला.

आई-वडिलांच्या खात्यातून पैसे वळविले

मंगेश त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा आहे. मंगेशकडे त्यांच्या बँकेचे व्यवहार आहे. अशातच युवतीच्या ट्रॅपमध्ये अडकलेल्या मंगेशने आरोपींना दिलेले पैसे आई-वडिलांच्या खात्यातून काढले. आधी त्यांच्या खात्यातून पैसे स्वत:च्या खात्यात वळविल्यानंतर ते तरुणींना पाठवले.