नागपूर : माकडचाळ्यानी शुक्रवारी शहरातील एका रुग्णालयात अक्षरशः उच्छाद मांडला. या माकडचाळ्यापुढे रुग्णालय प्रशासनही हतबल झाले. शेवटी रुग्णाच्या जीवावर बेतण्याची वेळ आली. तेव्हा ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या चमूने जीवावर उदार होत त्या माकडाला जेरबंद केले. कितीतरी तास चाललेला हा थरार रुग्णालयाच्या चमूने अनुभवला.
शहरात “न्यु ईरा” नावाचे मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात शुक्रवारी एक माकड शिरले. शहरात माकडांचा अधिवास नवा नाही. मात्र, रुग्णालयात शिरल्या शिरल्या त्याने माकडचाळे दाखवायला सुरुवात केली. रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना माकडाने त्रास द्यायला सुरुवात केली. त्याचे माकडचाळे पाहून कुणालाही त्याला हुसकवण्याची हिम्मत होत नव्हती. थोड्यावेळाने त्या माकडाने रुग्ण असलेल्या वार्डात प्रवेश केला आणि चक्क ते माकड रुग्णाच्या पलंगावर जाऊन बसायला लागले. त्यामुळे आधीच आजारी असलेल्या रुग्णाची अवस्था आणखीच बिकट झाली. रुग्णालय प्रशासनाच्या हाताबाहेर स्थिती गेली. त्यावेळी मग त्यांनी सेमीनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राला दूरध्वनीवरून या सर्व प्रकारची माहिती दिली.
ट्रान्झिटची चमू रुग्णालयात पोहचली आणि त्यांनी माकडाचे रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले. सेंटरचे हरीश किनकर रुग्णालयात माकडाचा शोध घेत असताना ते माकड एका रुग्णाच्या खाटेवर बसलेले होते. ते माकडाला पकडण्यासाठी जवळ गेले असता माकडाने त्यांना चावा घेतला. त्यावेळी जखमेचा विचार न करता किनकर यांनी माकडाला खोलीत बंद केले. मात्र, येथेही त्याचे माकडचाळे थांबले नाहीत. तेथून तो छतावर पीओपी मध्ये शिरला. तिथुन मग तो थेट कुलरच्या डकटिंगमध्ये शिरला.
किनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला घटनेचे गांभीर्य सांगितले आणि मग पीओपी तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पीओपी तोडून मग किनकर आत शिरले आणि शेवटी अथक प्रयत्नानंतर ते माकड जेरबंद करण्यात यश आले. जंगलातील वाघाच्या रेस्क्यू ऑपरेशन इतकेच हे माकडाचे रेस्क्यू ऑपरेशन कठीण होते. मात्र, ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राच्या चमूने जीवाची पर्वा न करता ही मोहीम फत्ते केली. या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये प्रशांत कोल्हे वनपाल, प्रतीक घाटे वनरक्षक, बंडू मंगर हेल्पर, विलास मंगर, ड्राइवर यांनी सहकार्य केले. नागपूर प्रादेशिकच्या उपवनसंरक्षक डॉ. विनिता व्यास आणि राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली.