नागपूर : आपत्कालीन स्थितीत रेल्वेचा प्रवास आदल्या दिवशी तिकीट आरक्षित करून करता यावे म्हणून रेल्वेने “तत्काल” तिकीट सुरू केली. परंतु सकाळी १० वाजता तिकीट विक्री सुरू होताच काही मिनिटात सर्व तिकीटे विकली जातात. हे कसे काय होते, याचा सामान्य प्रवाशांना थांग पत्ता लागत नाही. त्यावर आधार शिवाय तत्काळ तिकीट मिळणार नाही, हा नियम सर्वसाधारण प्रवाशांना दिलासा देणारा ठरू शकतो.
लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे ‘तत्काल’ आरक्षण केवळ ‘आधार’ प्रमाणित वापरकर्त्यांनाच करता येणार आहे. १ जुलैपासून याची अंमलबजावणी होणार असून १५ तारखेपासून आधार आधारित ‘ओटीपी’ प्रमाणिकरणही अनिवार्य असेल. तसेच तत्काल तिकिटे काढण्यास सुरुवात झाल्यानंतर ती ३० मिनिटांच्या कालावधीपर्यंत आरक्षित होणार नाहीत.
तत्काल आरक्षणामध्ये मोठी गडबड होत असल्याचे रेल्वेने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले होते. वातानुकूलित डब्यांसाठी सकाळी १० वाजता आणि सर्वसाधारण डब्यांसाठी सकाळी ११ वाजता तत्काल तिकीट आरक्षण खुले होते. मात्र आरक्षण सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच मिनिटापासून तिकिटे प्रतीक्षा यादीत जात असल्याच्या तक्रारी आहेत.
परिणामी, तत्काल सुविधेचा कोणताही लाभ सर्वसामान्य प्रवाशांना होत नसल्याने रेल्वे मंडळाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार अधिकृत तिकीट दलालांना तत्काल तिकिटे सुरू झाल्यापासून पहिल्या ३० मिनिटांत आरक्षण करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याचा अर्थ वातानुकूलित डब्यांसाठी सकाळी १०.३० पर्यंत आणि सामान्य डब्यांसाठी सकाळी
११.३० पर्यंत त्यांना परवानगी नसेल. रेल्वेच्या अधिकृत दलालाच्या संगणकीकृत पीआरएस खिडकीवर तिकीट आरक्षण उपलब्ध असेल. त्यानंतर यंत्रणेद्वारे वापरकत्याँच्या मोबाइलवर ओटीपी प्रमाणीकरण केले जाईल. त्याद्वारे प्रवाशांना तिकिटे आरक्षित करता येतील. १५ जुलैपासून तत्काल तिकीट आरक्षणासाठी आधार आधारित ‘ओटीपी’ प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात येईल.
प्रवाशांच्या तक्रारींची दखल
भारतीय रेल्वेमध्ये तत्काळ तिकीट काढताना गडबड होत असल्याची अनेक प्रवाशांची तक्रार होती. एका सर्वेक्षणानुसार, गेल्या १२ महिन्यांत ऑनलाइन तत्काळ तिकिटे आरक्षित करण्यात अडचणी आल्याचे मत १० पैकी ७ जणांनी नोंदविले होते. तत्काळ तिकिटाचे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटात तिकिटे प्रतीक्षा यादीत जातात, असे एका प्रवाशाने सांगितले. आता आधार प्रमाणीकरण बंधनकारक झाल्यानंतर सर्वसामान्य प्रवाशांना तत्काळ सेवेचा अधिक लाभ घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.