नागपूर : जरिपटकातील धान्य व्यापारी राजेंद्र उर्फ राजू दिपानी यांच्यावर ५ दिवसांपूर्वी झालेला गोळीबार आणि ५० लाखांच्या लूट प्रकरणाची उकल करण्यात गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला अखेर सोमवारी रात्री यश आले.
गुन्हे शाखेने या प्रकरणात ४ जणांसह हल्लेखोरांना जबलपूरपर्यंत नेऊन सोडणाऱ्या चालकाला अटक केली. यापैकी नागपूरातील चौघांना नागपूर- नांदेड मार्गावर अटक झाल्याची माहिती मिळत आहे. लूट प्रकरणातले सहा हल्लेखोर उत्तर प्रदेशातील भाडोत्री गुंड असून ते फरार आहेत. सुपारी देऊन ही लूट झाल्याचाही उलगडा करण्यापर्यंत पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे दुकानातल्या नोकरानेच ही टीप देऊन लूट केल्याचे सुगावे देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत.
समरजीत सिंग संतासिंग संधू (४२, मुकसर साहेब, पंजाब), शेख हुसैन उर्फ जावेद शेख बशीर (३७ राऊत नगर), सय्यद जिशान वल्द सय्यद रहमान (३२, जाफरनगर), अब्दूल नावेद अब्दूल जावेद (३३, गणेशपेठ) अशी गुन्हे शाखा पथक चारने अटक केलेल्यांची नावे आहेत.
यापैकी जावेद, नावेद आणि सरदार हे तिघेही गाड्यांच्या विक्रीचे व्यवहार करतात. यातूनच जावेदने यापूर्वी दिपानीसोबत हवाला व्यवहार केला होता. त्यानेच संधू या सरदारला दिपानी यांची टीप दिली. संधूने त्यासाठी उत्तर प्रदेशातील ६ भाडोंत्री गुंडांना नागपूरात बोलावले. उत्तर प्रदेशातील अफरोज नावाचा सुत्रधार सहा जणांना घेऊन तीन दिवसांपूर्वी मनिष नगरातल्या एका हॉटेलमध्ये थांबला. घटनेच्या दिवशी उत्तर प्रदेशातील भाडोत्री गुंडानी आधी दोन दुचाकी चोरल्या. दिपानी यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे सहाही जण वाडीच्या दिशेने पळाले. तिथे गाडी सोडून देत एका कारने ते जबलपूर मार्गे उत्तर प्रदेशात पळाले. हल्लेखोरांना जबलपूर पर्यंत सोडणाऱ्या कार चालकालाही गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर सुपारी देऊन लूट करणाऱ्या चौघांना नांदेड जवळून गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती सुत्रांनी दिली.