नागपूर : गेल्या काही दिवसांपासून जरीपटका पोलीस ठाण्याचा कारभार चांगलाच चर्चेत आहे. दोनच दिवसांपूर्वी जरीपटका ठाण्यातील कोठडीतील आरोपीने स्वतःच्या पोटात चाकू भोसकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर गेल्या चार दिवसांपूर्वी जरीपटका पोलिसांच्या वाहनातून कारागृहात बंद करण्यापूर्वीच आरोपीने पळ काढला. तो आरोपी अद्याप पोलिसांना गवसला नाही. तो गेला कुठे? असा प्रश्न विचारल्या जात असल्यामुळे नागपूर पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली आहे. या प्रकरणी एका हवालदाराला निलंबित करण्यात आले तर दोन कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरु आहे.

जरीपटक्यातील इंदोरा परिसरात राहणारा आरोपी अजय बोरकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे तब्बल नऊ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याला सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करण्यात आले. तेथून वरिष्ठांच्या आदेशाने मध्यवर्ती कारागृहात डांबण्यासाठी जरीपटका पोलीस ठाण्यातील कर्मचारी घेऊन जात होते. जरीपटक पोलीस ठाण्यातील तपास पथकातील (डीबी) वादग्रस्त पोलीस हवालदार कमलेश यादव, पोलीस अंमलदार अमित चवरे आणि मुरलीधर अंबादे हे तिघेही पोलीस कर्मचारी पोलीस वाहनात गप्पा करीत होते. त्यामुळे अजय बोरकर याला पोलीस वाहनातून पळून जाण्याची संधी मिळाली. रहाटे कॉलनी चौकात पोलीस वाहन पोहचल्यानंतर वाहतूक सिग्नलवर वाहनाची गती कमी झाली. पोलीस कर्मचारी भ्रमणध्वनीवर रिल्स बघण्यात व्यस्त असल्याचे बघून अजय बोरकर याने पोलीस वाहनातून उडी घेतली आणि पळाला.

हेही वाचा – अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार

बऱ्याच वेळानंतर आरोपी पळून गेल्याची बाब तीनही पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. पोलीस कर्मचाऱ्यांनी लगेच परिसरात शोधाशोध केली. मात्र, वरिष्ठ कारवाई करणार ही भीती मनात असल्यामुळे तिनही कर्मचाऱ्यांनी कुणालाही माहिती दिली नाही. शेवटी रात्र झाल्यानंतरही आरोपी गवसत नसल्यामुळे नाईलाजास्तव ठाणेदार आणि पोलीस उपायुक्तांना याबाबत माहिती देण्यात आली. ठाणेदाराने पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी लगेच धंतोलीकडे रवाना केले. मात्र, मध्यरात्रीपर्यंत आरोपी अजय बोरकर गवसला नाही. गेल्या तीन दिवसांपासून आरोपी पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे जरीपटका पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. आरोपी अजयचा शोध सुरु असल्याची प्रतिक्रिया ठाणेदार अरुण क्षीरसागर यांनी दिली.

हेही वाचा – अकोला : सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात होते, मिटकरींच्या आरोपाने खळबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस हवालदार निलंबित तर दोघांची चौकशी

जरीपटका पोलीस ठाण्यातील वादग्रस्त असलेला पोलीस हवालदार कमलेश यादव याला पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहे. तर उर्वरित दोघे पोलीस अंमलदार अमित चवरे आणि मुरलीधर अंबादे यांना कारणे दाखवा नोटिस देऊन विभागीय चौकशी सुरु केली आहे. तर वाहन चालक तुषार पडोळे याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.