अकोला : राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी व कामगार विभागातील सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कामगार भवन उभारण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यात नवीन कामगार भवनाचे बांधकाम करण्यासाठी १६ कोटींहून अधिक रकमेस वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली.

अकोला येथील कामगार भवन (नवीन प्रशासकीय इमारत) ८१०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या शासकीय जागेत प्रशासकीय इमारत बांधकाम व विविध सुविधांसह निर्माण होणार आहे. इमारत प्रशस्त असून तळमजला व त्यावर तीन मजले असतील. विद्युतीकरण, आग प्रतिबंधक, पाणी पुरवठा व मलनि:सारण, संरक्षक भिंत व गेट, अंतर्गत रस्ते, भू-विकास, पार्किंग, फर्निचर आदी बाबींसाठील १६ कोटी ६१ लाख रुपयांच्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

अकोला येथील प्रस्तावित कामगार भवनामध्ये (प्रशासकीय इमारत) कामगार प्रभागांतर्गत असलेले सहायक कामगार आयुक्त अकोला यांचे कार्यालय, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचे कार्यालय, घरेलू कामगार कल्याण मंडळ यांचे कार्यालय, अकोला-वाशिम-बुलढाणा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ यांचे व औद्योगिक सुरक्षा संचालनालय यांचे कार्यालय स्थलांतरित करण्यात येईल. कामगार भवन निर्माण होत असल्यामुळे कामगारांना एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ मिळवून देणे शक्य होईल, असा विश्वास कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी व्यक्त केला. धुळे येथील कामगार भवनाच्या कामालाही प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकाच इमारतीत विविध योजनांचा लाभ

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार, कामगारांसाठी विविध योजना राबवतात. यामध्ये बांधकाम कामगारांसाठी विशेष योजना, असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना, तसेच कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण आणि आरोग्य योजनांचा समावेश आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये कामगारांना विमा संरक्षण मिळते. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जातात. कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण आणि आरोग्य योजना तसेच इतर योजनांचा समावेश आहे. आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभारून कामगारांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याचे विभागाकडून सांगण्यत आले.