लोकसत्ता टीम

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अॅड. पंकज शंभरकर यांना झटका देत त्यांचे नामांकन फेटाळण्याचा निर्णयही कायम ठेवला. रश्मी बर्वे प्रकरणाप्रमाने याप्रकरणी देखील न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. न्या.अनिल किलोर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

शंभरकर यांनी निवडणुकीच्या शपथपत्राच्या प्रत्येक पानावर स्वाक्षरी केली नसल्यामुळे त्यांचे नामांकनपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २८ मार्च रोजी रद्द केले. परिणामी, शंभरकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोंदविलेले सर्व आक्षेप २७ मार्च रोजीच दूर केले होते. असे असताना नामांकनपत्र फेटाळण्यात आले. त्यामुळे हा निर्णय अवैध ठरविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

आणखी वाचा-नवमतदारांसाठी ७ एप्रिलला ‘केक पार्टी’ उत्सव, काय आहे नाविन्यपूर्ण उत्सवाचे महत्त्व… वाचा

न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देऊन शंभरकर यांची याचिका निकाली काढली. शंभरकर यांना निवडणूक संपल्यानंतर निवडणूक याचिका दाखल करण्याची मुभा देण्यात आली. शंभरकर यांच्यावतीने अॅड. राहुल हजारे यांनी बाजू मांडली.