नागपूर : लक्ष्मीनगरसारख्या गजबजलेल्या चौकात स्पा-मसाज सेंटरच्या नावावर सुरु असलेल्या ‘सेक्स रॅकेट’वर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा घातला. या छाप्यात देहव्यापार करणाऱ्या तीन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर स्पा-मसाज पार्लरच्या संचालिकेला अटक केली. सीमा अंशूल बावनगडे (३६, कमालचौक) असे मसाज पार्लरच्या संचालिकेचे नाव आहे. देहव्यापार संदर्भात तिच्यावर यापूर्वीही तीन गुन्हे दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर चौकात विद्यार्थ्यांची नेहमी गर्दी असते. या परिसरात मोठमोठी दुकाने, हॉटेल्स आणि कॉफी शॉप आहेत. त्यामुळे आरोपी महिला सीमा बावनगडे हिने ’हेवन स्पा-मसाज सेंटर’ नावाने दुकान सुरु केले. सुरुवातीला ग्राहकांना सीमाने मसाज सेवा पुरवली. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मसाज सेंटरमध्ये तिने १८ ते २२ वर्षे वयोगटातील मुलींना कामावर ठेवले. त्यानंतर तिच्या मसाज सेंटरमध्ये ग्राहकांची गर्दी वाढायला लागली.

हेही वाचा – गोंदिया : ‘ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपर आणा’; भाकप, ‘बीआरएसपी’ आक्रमक

तिने नागपुरातील नंदनवन, अजनी, गिट्टीखदान, वाडी आणि प्रतापनगर परिसरातील काही तरुणींना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. तसेच तिने काही अल्पवयीन मुलींंनाही जाळ्यात ओढले होते. महाविद्यालयीन तरुणींना जाळ्यात ओढून तिने यापूर्वीही सेक्स रॅकेटमध्ये ढकलले होते. पीडित तीन तरुणी सीमाच्या मसाज सेंटरमध्ये काम करीत होत्या. सीमा त्यांना आंबटशौकीन ग्राहक शोधून देत होती. या मसाज सेंटरमध्ये महाविद्यालयीन तरुणींची गर्दी वाढल्यामुळे आजुबाजूच्या दुकानदारांना संशय आला. त्यांनी गुन्हे शाखेच्या (एसएसबी) प्रमुख पोलीस निरीक्षक कविता ईसारकर यांना माहिती दिली.

पोलिसांनी शहानिशा करुन तेथे देहव्यापार सुरु असल्याची खात्री केली. मंगळवारी रात्री १० वाजता बनावट ग्राहकांना पोलिसांनी हेवन स्पा-मसाज सेंटरवर पाठवले. सीमाने त्या ग्राहकाला ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तिने तीन तरुणींना स्वागत कक्षात बोलावले. ग्राहकासोबत एक तरुणी मसाज करण्याच्या खोलीत गेली. त्या तरुणीने अतिरिक्त पैशाची मागणी करीत शारीरिक संबंधासाठी होकार दर्शविला. बनावट ग्राहकाने बाहेर दबा धरुन बसलेल्या पोलिसांना इशारा केला. काही वेळातच पोलिसांनी छापा घालून तीन तरुणींना ताब्यात घेतले.

हेही वाचा – प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?

सीमा हिला पैशासह अटक केली. तरुणींकडून देहव्यापार करवून घेत असल्याची कबुली दलाल सीमा हिने दिली. कारवाईत पोलिसांनी ३ पीडित मुलींची सुटका केली. दलाल सीमा बावनगडे हिच्या ताब्यातून २ मोबाईल, ४ हजारांची रोख रक्कम, डिव्हिआर व ईतर साहित्यांसह एकूण ३७ हजार ३८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सीमाविरुद्ध गुन्हा दाखल करत जप्त मुद्देमालासह तिला बजाजनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित तरुणीपैकी एक तरुणी विवाहित आहे. तिचा पती मजूर असून तिला एक मुलगा आहे. ती घरखर्च चालविण्यासाठी देहव्यापाराकडे वळली. ती पूर्वी पार्लरमध्ये काम करीत होती. तिला सीमाने आपल्या स्पा-मसाज पार्लरमध्ये घेतले. तिच्याकडून देहव्यापार करवून घेत होती. आर्थिक परिस्थितीने खचलेल्या विवाहित महिलेचा पती कळमना मार्केटमध्ये मजूर आहे. त्याला पत्नीच्या या कृत्याबाबत माहितीसुद्धा नाही.