नागपूर : ९ सप्टेंबर २०२५ रोजी, नागपूर मेट्रोच्या प्रवाशांपैकी तब्बल ४७ हजार प्रवाशांनी ‘महाकार्ड’ वापरून प्रवास केला, जो आतापर्यंतचा महाकार्डव्दारे झालेला प्रवास आहे. त्यामुळे एका विक्रमा नोंद झाली आहे. जास्तीत जास्त प्रवाशांकडून तिकीट खरेदीसाठी डिजीटल पेमेन्टसचा वापर हा मेट्रो प्रवाशांचा डिजीटल कल दर्शवतो.

महाकार्डच्या विक्रमी वापरासोबतच डिजिटल व्यवहारांचा टक्का ५७ % पर्यंत पोहोचला असून, ९ सप्टेबरला एकूण १ लाख १९ हजार ७२ मेट्रो प्रवाशांपैकी सुमारे ६८ हजार ५०० प्रवाशांनी विविध डिजिटल माध्यमांचा वापर करून तिकीट काढले. यामध्ये सुमारे ९००० व्हॉट्सॲप तिकीट वापरकर्ते आणि १४५०० यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) वापरकर्त्यांचा समावेश आहे.

या सर्व घडामोडी ‘डिजिटल मेट्रो’च्या दिशेने महामेट्रोने घेतलेल्या सकारात्मक पावलांचे प्रतिक मानले जात आहे आणि नागपूरकर प्रवाशांमध्ये रोखरहित व सुलभ प्रवास पद्धती स्वीकारण्याची वाढती प्रवृत्ती दर्शवीत आहे. महा कार्ड व डिजिटल पेमेंटचा वाढता वापर तसेच नागपूर मेट्रोवरील विश्वास व प्रवास सुलभतेचा पुरावा आहे, असा दावा महामेट्रोने केला आहे.

नागपुरात मेट्रोचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मेट्रोव्दारे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आता मेट्रो टप्पा-२ व्दारे नागपूरला लगतच्या छोट्या शहरांना जोडण्यात येणार आहे. महामेट्रोने बांधलेल्या डबर डेकल पुलाची नोंद नुकतीच गिनिज बूक ऑफ वर्ल्डमध्ये करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांनी मेट्रो स्वीकारल्याचा दावा नुकताच केला होता. नवीन नागपूर प्रकल्पाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे भविष्यात मेट्रोचा विस्तार होणार हे निश्चित मानले जात आहे.

ही उपलब्धी महा मेट्रोच्या सुरक्षित, विश्वासार्ह व तंत्रज्ञानाधित सार्वजनिक परिवहन सेवा देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. शिवाय, एकूण तिकीट महसूलपैकी ५०% पेक्षा अधिक डिजिटल पेमेंटचे हे संकेत आहेत की, नागपूरकर प्रवासी आता जलद, सोपा व रोखरहित व्यवहार स्वीकारण्यास तयार आहेत.