नागपूर : घर, व्यावसायिक प्रतिष्ठानातील वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणसह त्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दोष देत संताप व्यक्त करणारे खूप दिसतात. परंतु बऱ्याचदा कठीन परिस्थितीत जीवाची बाजी लावून हे कर्मचारी सेवा देत असतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा केंद्रास वीजपुरवठा करणारी वाहिनी तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडली. अशावेळी महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत दुथडी भरून वाहणारी वेणा नदी पार करून दुरूस्ती केली. त्यामुळे १२ ते १४ गावांतील पाणीपुरवठा पुर्ववत झाला.

नागपूर जिल्ह्यात रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ३३ केव्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा केंद्रास वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीत अचानक बिघाड झाला. या वाहिनीद्वारे नागपूर शहरालगतच्या गावांना पाणीपुरवठा होतो, त्यामुळे हा बिघाड तातडीने दुरुस्त करणे अत्यावश्यक होते. महावितरणच्या उमरेड उपविभागांतर्गत असलेल्या बेला शाखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाहणी सुरू केली. त्यांना रामा धरणाजवळ, वेणा नदीच्या पलीकडे, उच्च दाब वाहिनीवर एक ‘जीआय गार्डिंग वायर’ अडकलेली दिसली. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नदीच्या पलीकडे जाण्यासाठी नाव उपलब्ध नव्हती.

दरम्यान, एकीकडे गावातील पाणीपुरवठा ठप्प होण्याची भीती, तर दुसरीकडे दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचे संकट होते. यावेळी बेला वितरण केंद्राचे दोन कर्तव्यनिष्ठ कर्मचारी तंत्रज्ञ प्रतिक तुरळे आणि बाह्यस्रोत कर्मचारी नितीन कावळे यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. दोघांनी विचार न करता वेणा नदीच्या थंडगार आणि तुडूंब भरलेल्या पाण्यात ‘ट्यूब’ घेऊन उडी घेतली.

जीवाची पर्वा न करता ते दोघे पोहत नदीच्या पलीकडे पोहोचले. पोहत पलीकडे गेल्यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांनी अत्यंत धोकादायक परिस्थितीत ३३ केव्हीच्या उच्च दाब वाहिनीवरील अडकलेली वायर काढली. दुपारी ठीक तीन वाजून २६ मिनिटांनी ही वाहिनी पुन्हा सुरू झाली आणि गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत झाला.

यावेळी उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी या दोन्ही ‘जनमित्रां’चे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता संजय वाकडे, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे आणि उपकार्यकारी अभियंता पंकज होनाडे यांनीही प्रतिक तुरळे आणि नितीन कावळे यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. हे चलचित्र समाज माध्यमांवरही प्रसारित झाले आहे. त्यांचे सर्वसामान्य नागरिकांकडूनही स्वागत केले जात आहे.