नागपूर : कोराडी मार्गावरील मानकापूर पुलावरून उडी घेत तरुणाने भर दुपारी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. दुपारी दिडच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे वर्दळीचा रस्ता असलेल्या या भागात वाहतूक व्यवस्था खोळंबली.

हा तरुण सावनेरच्या दिशेने उड्डाणपुलावरुन सदरकडे जात होता. पागलखाना चौकाजवळ पोचताच त्याने गाडी उड्डाणपुलावरच थांबवली. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात तो पुलाच्या कठड्यावर चढला. भर दुपारी दिडच्या सुमारास हा तरुण पुलावरून उडी मारत असताना अनेकांनी पाहिले. काही जणांनी ओरडून त्याला उडी मारू नको, असेही दरडावले. मात्र त्याने काही क्षणातच उडी घेतली.

पुलाच्या खालूनही मोठ्‌या प्रमाणात त्यावेळी वाहतूक सुरू होती. भर दुपारी तरुणाने पुलावरून उडी घेतल्याने परिसरात खळबळ उडाली. काही जणांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर त्याचा प्राण गेला होता. कोणीतरी मानकापूर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांचे फिरतीवर असलेले पथक काही वेळातच घटनास्थळी पोचले. तरुणाच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरुणाने घातलेले कपडे पाहता तो लष्कर अथवा पोलीस भरतीसाठी तयारी करत असल्याचे दिसत आहे. मानकापूर पोलिसांनी त्याला तातडीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवले.