आता प्रत्येक १५ मिनिटांनी एक फेरी
नागपूर : मेट्रो रेल्वेच्या वेगवान प्रवासाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना बुधवारी याचा आनंद प्रत्यक्ष घेता आला. ३० किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी मेट्रो ८० किलोमीटर प्रति तास वेगाने धावली.
मेट्रोच्या वेगवान प्रवासाची घोषणा महामेट्रोने यापूर्वी केली होती. त्याचा प्रचारही झाला होता. मात्र प्रत्यक्षात बुधवारपासून खऱ्या अर्थाने ताशी ८० किलोमीटर या वेगाने मेट्रो धावली. तेव्हा यात बसलेल्या प्रवाशांना त्यांचे गंतव्यस्थानक कधी आले हे कळले सुद्धा नाही. बुधवारी या वेगवान प्रवासाचा आनंद घेण्यासाठी पत्रकारांची भेट आयोजित करण्यात आली होती. मेट्रोचा वेग वाढल्याने तिच्या फे ऱ्यांची संख्याही वाढली आहे. आता दररोज प्रत्येक १५ मिनिटांनी एक फेरी होणार असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. ताशी ८० किलोमीटर वेगामुळे अर्ध्या तासाचा हा प्रवास अवघ्या काही मिनिटांवर आला आहे. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत मेट्रो धावणार असून यादरम्यान मेट्रोच्या १०० फेऱ्या होतील. खापरी ते सीताबर्डी असा हा प्रवास असणार आहे. यादरम्यान जयप्रकाशनगर, एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊटपॉईंट, न्यू एअरपोर्ट याठिकाणी मेट्रो थांबणार आहे. वेगवान मेट्रोमुळे कमीतकमी वेळात आणि आरामात प्रवाशांना त्यांच्या ठिकाणावर पोहोचता येणार आहे.
छत्रपती स्थानक जानेवारीत सुरू होणार
महामेट्रोच्या वर्धा मार्गावरील सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्थानक ते खापरी या दरम्यान छत्रपतीनगर मेट्रो स्थानकाहून जानेवारी २०२० पासून प्रवासीसेवा सुरू करण्यात येणार आहे. मेट्रो प्रत्येक महिन्याला दोन स्थानकांचे काम पूर्ण करीत आहे, अशी माहिती महामेट्रोचे प्रबंध संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. सीताबर्डी ते खापरीदरम्यान दरमहिन्याला साधारणत: चार ते पाच हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. डिसेंबर महिन्यात बन्सीनगर स्थानक व वासुदेवनगर स्थानक, जानेवारी महिन्यात छत्रपतीनगर स्थानक व रहाटे कॉलनी स्थानक आदी स्थानकांचे काम केले जाणार आहे. कामाची गती पाहता डिसेंबर २०२० पर्यंत मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.
ब्रॉडगेजच्या डीपीआरला मंजुरी
महामेट्रोच्या ब्रॉडगेज डीपीआरला रेल्वे मंडळाने मंजुरी दिली आहे. आता हा डीपीआर मंडळातर्फे मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे विभागाला पाठवण्यात येणार आहे. तसेच याबाबतचा करार मेट्रो आणि रेल्वे विभागात केला जाणार आहे, अशी माहिती ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. मेट्रो स्थानकावरील अतिरिक्त जागेचा व्यावसायिक वापर करण्यात येणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.