नागपूर : रस्ते, रस्त्यावरील खड्डे, पिण्याचे पाणी, अस्वच्छता तसेच घर कर आणि पाण्याचे देयक यासंदर्भातील अनेक समस्या आहेत. त्या सोवडण्यात महापालिका प्रशासनाला अपशय आले आहे. त्याविरोधात शहर काँग्रेसने आज, मंगळवारी महापालिका कार्यालयासमोर निदर्शने केले आणि कार्यालयातील कुंड्या फोडून निषेध नोंदवला. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन महापालिका मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

शहरातील विविध समस्यांवरून आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. त्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठनकर यांना निवेदन देण्यात आले. महापालिकेत सुमारे चार वर्षांपासून प्रशासक राज आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध कामे करवून घेण्यात अडचणी निर्माण होत आहे. प्रशासकाकडून नागरिकांना योग्य दिलासा देण्यात विलंब होत आहे. महागाई प्रचंड वाढल्याने जनता त्रस्त आहे आणि महापालिका घर कर आणि पाण्याच्या दरात सवलत देत नाही. पाण्याचे देयक कमी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच चोवीस तास पाणी पुरवठा योजना नागपुरात सुरू असताना अजूनही अनेक भागात पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. उन्हाळ्याची चाहूल लागताच काही भागात पिण्याच्या पाणीची समस्या निर्माण झाली आहे. अनेक वस्त्यांमध्ये मलनिस्सारण वाहिन्या फुटल्या आहेत. रस्त्यावर खड्डे आहेत. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात अनेक प्रभागात पाणी मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या आंदोलनात प्रदेश व्यापारी सेल प्रमुख व सरचिटणीस अतुल कोटेचा, सचिटणीस उमाकांत अग्निहोत्री, कमलेश समर्थ, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, संजय दुबे, संदेश सिंगलकर, शहर उपाध्यक्ष प्रा. दिनेश बानाबाकोडे, बंडोपंत टेंभुर्णे, अरुण डवरे, कोमल गजभिये, अक्षय समर्थ, महिला पदाधिकारी नॅश अली, नंदा देशमुख, सुकेशनी डोगरे, अनिता ठेंगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील अनेक ठिकाणी अतिक्रमण करून ‘शो रुम’ सुरू उघडण्यात आल्या आहेत. महापालिका त्यांच्यावर कारवाई करत नाही. मात्र, हातठेले, फेरीवाले जे लोक पोट भरण्यासाठी रस्त्यावर फिरतात त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाते. त्यांचे साहित्य जप्त केले जाते. दुकानदारांकडून वसूली केली जाते, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.