नागपूर : पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे सात प्रभाग आहेत. २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे १६ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचे सात व बसपचा एक नगरसेवक विजयी झाला होता. अशा या भाजपला अनुकूल मतदारसंघात काँग्रेसला विजयी करण्याचे आव्हान शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासमोर आहे.

या मतदारसंघातील दोन प्रभागांचा बरचसा भाग दक्षिण-पश्चिम आणि उत्तर नागपूरला जोडण्यात आला आहे. त्यामुळे सात प्रभागांपैकी ९ आणि १३ हे दोन प्रभाग मिळून पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात केवळ ४ नगरसेवक आहेत. या मतदारसंघातील सात प्रभाग मिळून २४ नगरसेवक आहेत. त्यापैकी सात काँग्रेस, एक बसपा आणि १६ भाजपचे होते.

आमदार विकास ठाकरे यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला ७ हजार ७१६ मतांनी पराभूत केले होते. २०२४ मध्ये त्यांची एकूण मतांची संख्या एक लाख पार गेली. परंतु विजयातील अंतर कमी झाले. त्यांना १ लाख ४ हजार १४४ मते मिळाली आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांना ९८ हजार १६६ मते मिळाली. या आकडेवारीवरून काँग्रेसला सात नगरसेवकांची संख्या पुढे वाढवण्यासाठी मोठे परिश्रम करावे लागण्याचे संकेत मिळत आहेत.

पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील सात प्रभागांपैकी ९ आणि १३ इतर मतदारसंघात विभागले आहेत. प्रभाग क्रमांक ९ उत्तर आणि पश्चिम नागपूर विधानसभा आणि प्रभाग क्रमांक १३ पश्चिम नागपूर आणि दक्षिण-पश्चिम नागपुरात आहे. प्रभाग क्रमांक १०, ११, १२, १४ आणि १५ हे शंभर टक्के पश्चिम नागपूर विधानसभेत आहेत. प्रभाग क्रमांक ९ मध्ये गड्डीगोदाम आणि आजबाजूच्या वसाहती पश्चिम नागपूरमध्ये येतात. इंदोरा आणि आजूबाजूचा परिसर उत्तरमध्ये येतो. प्रभाग क्रमांक १३ चा काही भाग दक्षिण-पश्चिम विधानसभेत आहे. पांढराबोडी आणि आजूबाजूचा भाग पश्चिम नागपूरमध्ये आणि कॉर्पोरेशन कॉलनी, अंबाझरी ले-आऊटचा परिसर दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात आहे.

प्रभाग क्रमांक ९ मध्ये बसपाचा नगरसेवक आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये तिन्ही भाजपचे नगरसेवक आहेत. प्रभाग क्रमांक १० मध्ये काँग्रेसकडे सर्व चार नगरसेवक आहेत. प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपचे चार, प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपचे दोन आणि काँग्रेसचे दोन तर प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपचे तीन आणि काँग्रेसचा एक नगरसेवक आहे.