दिवसाला १२ हजार कुटुंबांचे माहिती संकलन; महापालिकेची गती अचंबित करणारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राम भाकरे, लोकसत्ता

नागपूर : करोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याचा लेखाजोखा शासनाकडे असावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेतली व स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. नागपूर महापालिकेची या सर्वेक्षणाची गती अचंबित करणारी ठरली आहे. केवळ २२ दिवसात २ लाख ८१ हजार ८६८ घरांना भेटी देऊन कर्मचाऱ्यांनी ९ लाख ९५ हजार २९७ लोकांची आरोग्यविषयक माहिती गोळा केल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

महापालिकेच्या आकडय़ांचा अभ्यास केला तर दिवसाला १२ हजार ७३७ कुटुंबांना महापालिकेचे कर्मचारी भेटले व त्यांच्याकडून माहिती घेतली असा निष्कर्ष निघतो. सर्वेक्षणाची गती लक्षात घेतली तर कुटुंबांकडून मिळालेली माहिती कितपत खरी असा प्रश्न पडतो.

१५ सप्टेंबरपासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली तरी सुरुवातीला आशा कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अभियानाला प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय सर्वेक्षणासाठी लागणारे साहित्य पोहोचले नसल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस काम रेंगाळले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसात  दहाही झोनमध्ये ४८८ पथक काम करत असून लोकांच्या घरी जाऊन प्रत्येक सदस्यांची तपासणी केली जात असल्याचे महापालिका सांगते. शहराची लोकसंख्या २५ लाख ७९ हजार ८०७ असताना गेल्या २२ दिवसात ९ लाख ९५ हजार २९७ लोकांची तपासणी झाली आहे. ज्यांना अजूनही करोनाची लागण झाली नाही आणि त्यांना करोना होऊन गेला आहे अशांना पथकाच्या माध्यमातून मागदर्शन केले जात असून त्यांची तपासणी केली जात आहे.

शहराची लोकसंख्या- २५ लाख ७९ हजार ८०७

झोन                  पथक              घरे               तपासणी

लक्ष्मीनगर             ४५              २६२७८       ७०९६४

धरमपेठ                ३१               २०१२८        ६३९३१

हनुमाननगर            ३८            १६१६०         ४२६४९

धंतोली                    ४२            २६७५३          ९३६७२

नेहरूनगर              ५२            ३९३७८         १५४३०५

गांधीबाग              ४२            ३४००५         १२८६४१

सतरंजीपुरा             ६०            २६९७४        १११६१९

लकडगंज              ४१            ३९४५२         १४०७४०

आशीनगर            ५९            २७८४४          १०८५८९

मंगळवारी              ४८            २४८९६         ८०१८७

 

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाअंतर्गत घरोघरी तपासणी केली जात असल्यामुळे करोनाबधितांना वेळेत उपचार मिळवून देणे शक्य होत आहे. घरी आलेल्या पथकाला नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे.  

– डॉ. भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी, महापालिका.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur municipal corporation my family my responsibility zws
First published on: 08-10-2020 at 00:29 IST