नागपूर : गेंड्याला तीन शिंग असतात, पण निलगायीला सुद्धा तीन शिंग असतात, असे कुणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र, सध्या वाघांसाठी ओळखल्या जाणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यात चक्क निलगायीला तीन शिंगे आढळून आल्याने अधिकारी सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. कारण आजवर तरी निलगायीला तीन शिंग असल्याची घटना कुठे नोंदवली गेली नाही आणि म्हणूनच टिपेश्वरचे अधिकारी त्यादृष्टीने अभ्यास करत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात अलीकडे एक अद्वितीय घटना नोंदवली गेली. गस्ती दरम्यान वनकर्मचाऱ्यांच्या कॅमेऱ्यात एका नर नीलगायीचा (Bluebull – Boselaphus tragocamelus) तीन शिंगांसह दुर्मिळ अविष्कार कैद झाला आहे. सामान्यतः नर नीलगायीला फक्त दोनच शिंगे असतात. मात्र, या नीलगायीच्या कपाळावर दोन नियमित शिंगांबरोबरच मधोमध एक लहान तिसरे शिंग स्पष्ट दिसून आले आहे. हा प्रकार अत्यंत दुर्मिळ असून, नीलगायच्या बाबतीत अशा नोंदी अत्यल्प आहेत. या दुर्मिळ नीलगायीला विभागीय वन अधिकारी श्री. उत्तम फड, सहाय्यक वनसंरक्षक श्री. उदय आव्हाड व वनरक्षक श्री. रवी धुर्वे यांनी गस्ती दरम्यान प्रत्यक्ष पाहिले.
या घटनेमुळे टिपेश्वर अभयारण्याचे जैवविविधतेतील वेगळेपण अधोरेखित झाले आहे.वन्यजीवांच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी हा दुर्मिळ प्रकार महत्त्वाचा ठरू शकतो. टिपेश्वरसारख्या अभयारण्यात अशी विलक्षण निसर्गनिर्मिती दिसणे हे अभयारण्याच्या समृद्ध जैवविविधतेचे निदर्शक आहे. आजतागायत टिपेश्वर अभयारण्यातील वाघांमुळे हे अभयारण्य ओळखले जात होते. “अवनी” या वाघिणीमुळे या अभयारण्याची जगभरात ओळख झाली. अर्थातच “अवनी” ला निष्कारण मारल्या गेले. तिच्यावर १४ माणसांच्या मृत्यूचा ठपका ठेवण्यात आला, जो चुकीचा होता. त्यानंतर या अभयारण्यातील वाघांचे लांब पल्ल्यांचे स्थलांतर यामुळे देखील टिपेश्वरची ओळख समोर आली. मात्र, आता निसर्गाचा चमत्कार घडला आणि या अभयारण्यात चक्क तीन शिंगांची नीलगाय आढळली.
यामागील संभाव्य वैज्ञानिक कारण
Genetic mutation (जनुकीय बदल) – शिंगाच्या वाढीचे नियंत्रण करणाऱ्या जनुकांमध्ये झालेल्या बदलामुळे निसर्गाने ही विलक्षण रचना निर्माण केली असावी.
या शोधाचे महत्त्व
नीलगायमध्ये तीन शिंगे असलेले उदाहरण अत्यंत दुर्मिळ असून, भारतात अशा नोंदी फारशा झालेल्या नाहीत. जगभरात गायी, शेळ्या किंवा मेंढ्यांमध्ये अशा विचित्र रचनांचे (तीन किंवा चार शिंगे) उदाहरणे अधूनमधून आढळतात, पण नीलगायमध्ये ही घटना विशेष महत्त्वाची आहे.