नागपूर : पाऊस परतीच्या मार्गावर असला तरीही पावसाचा धुमाकूळ मात्र सुरूच आहे. त्यातच आता विषारी साप, नाग निघण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दोन दिवसांपूर्वी चक्क स्वयंपाकघरातच विषारी नागाने ठाण मांडले. यामुळे कुटुंबीयांची त्रेधातिरपीट उडाली.अखेर सर्पमित्र हर्षल शेंडे त्या कुटुंबीयांच्या मदतीला धावून आले.
हिंगणा तालुक्यातील किन्ही गावातील एक गावकऱ्यांच्या स्वयंपाकघरातून विषारी नागाचा थरार रंगला. कुटुंबातील सदस्य या घटनेने घाबरले होते. गुरुवारी रात्री हिंगणा तालुक्यातील किन्ही गावात खळबळ उडाली, जेव्हा ग्रामस्थांनी घराच्या स्वयंपाकघरात विषारी नाग पाहिला. घाबरलेल्या ग्रामस्थांनी तात्काळ सर्पमित्रांना कळवले. माहिती मिळताच सर्पमित्र हर्षल शेंडे आपल्या सहकाऱ्यांसह लक्ष्मण राऊत आणि जय येलेकर यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. घरातील स्वयंपाकघर तपासताना सर्वजण थक्क झाले. कारण नाग भांड्यांच्या रॅकवर लपलेला होता. त्यामुळे या ठिकाणाहून त्याला रेस्क्यू करणे तसे कठीणच होते.
हर्षल शेंडे म्हणाले, “नाग इतक्या विचित्र जागी लपला होता की कुणालाही संशय येणार नाही. आम्ही शांतपणे त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. तो खिडकीत अडकला होता, मात्र काही मिनिटांच्या सावध प्रयत्नानंतर आम्ही त्याला सुरक्षितरीत्या बाहेर काढले.” बचाव कार्य पूर्ण झाल्यावर नागाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आणि सर्पमित्र पथकाचे मनःपूर्वक कौतुक केले. यावेळी सर्पमित्र हर्षल शेंडे यांनी ग्रामस्थांना आवाहन केले.
स्वयंपाकघरातच विषारी नागाने ठाण मांडले. यामुळे कुटुंबीयांची त्रेधातिरपीट उडाली.https://t.co/ZfyIjgJO7V#Kitchen #snake #Indiancobra pic.twitter.com/ycUNfIQCbP
— LoksattaLive (@LoksattaLive) September 19, 2025
“साप दिसल्यास घाबरू नका, मारू नका – तात्काळ तज्ञांना बोलवा. तुमचा एक फोन एखाद्याचे प्राण वाचवू शकतो!” साप दिसल्यास हर्षल शेंडे यांच्याशी ८२७५३२५२७३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले। गावातच नाही तर आता शहरात देखील साप निघण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडेच चिंचभुवन परिसरात एकदा रस्त्यावरच अजगराने ठाण मांडले होते. तर आठ दिवसांपूर्वी याच परिसरात एका वसाहतीतील इमारतीत चक्क चपलांच्या स्टँडवर सापाने ठाण मांडले होते. यापूर्वी ग्रामीण भागातच या घटना घड्याच्या, पण आता मात्र शहरात देखील साप निघण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सर्पमित्रांना बोलवावे. कित्येकदा सर्पमित्र जीवावर उदार होऊन त्या सापाला अलगद रेस्क्यू करून नागरिकांना त्या सापापासून वाचवतात. त्यामुळे नागरिकांनी कायम सर्पमित्रांची मदत घ्यावी, असे आवाहन सर्पमित्रांची केले आहे.