अभय देणाऱ्यांचीही चौकशी होणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : शिवसेनेचा निलंबित शहर प्रमुख मंगेश कडव याला अखेर अटक करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. त्याला पांढराबोडी परिसरातून आज बुधवारी सायंकाळी ७ वाजता अटक करण्यात आली. त्याला इतके दिवस अभय देणाऱ्यांचीही कसून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिली.

मंगेश कडव याच्याविरुद्ध आतापर्यंत सक्करदरा, हुडकेश्वर, अंबाझरी, बजाजनगर आणि सीताबर्डी पोलीस ठाण्यात फसवणूक, खंडणी मागणे, धमकावण्याचे पाच गुन्हे दाखल आहेत. आठवडाभरापासून तो फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्या शोधात पोलीस भंडारा, गडचिरोली व मुंबई येथेही जाऊन आले. पण, सोमवारी त्याची पत्नी डॉ. रुचिता हिला व्हिम्स रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर पडताच  अटक करण्यात आली. त्याचवेळी मंगेश कडवही पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती होती. दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर व त्यांची चमू त्याच्या मागावर होती. मंगेश हा अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी परिसरात लपून बसला असून पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी निघाला असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. त्यानंतर सायंकाळी

७ वाजता पोलिसांनी रस्त्यातच त्याला अटक केली. रात्री उशिरापर्यंत त्याची अटक प्रक्रिया सुरू होती.

इतके दिवस तो कुठे लपून होता, त्याला अभय देणाऱ्यांचीही चौकशी करण्यात येईल, अशी माहिती गजानन राजमाने यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

पत्नीला दुसऱ्या गुन्ह्य़ात अटक

सक्करदरा पोलीस ठाण्यात दाखल २५ लाखांनी फसवणूक करण्याच्या गुन्ह्य़ात कडवची पत्नी डॉ. रुचिता हिला सोमवारी अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. बुधवारी न्यायदंडाधिकाऱ्यांची तिची कारागृह कोठडीत रवानगी करतानाच गुन्हे शाखा पोलिसांनी तिला हुडकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल दुसऱ्या गुन्ह्य़ात अटक केली.

शिवसेना नेत्याच्या नावाची चर्चा

मंगेश कडव याला शहरातील एका शिवसेना नेत्याने इतके दिवस अभय दिले होते, अशी चर्चा आहे. या शिवसेना पदाधिकाऱ्याची लवकरच कसून चौकशी करण्यात येईल. त्याचा कोणत्या गुन्ह्य़ात सहभाग असल्यास आरोपी करण्यात येईल, अशी माहिती राजमाने यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur police caught mangesh kadav zws
First published on: 09-07-2020 at 00:11 IST