नागपूर : गेल्या १० दिवसांत शहरातील पब, क्लब, हुक्का, बारमध्ये घडलेल्या घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली होती. त्याची दखल पोलीस आयुक्तांनी घेतली असून बुधवारी काही आदेश जाहीर केले.

शहरातील हाणामारी, तोडफोड, गोंधळ, विनयभंगाच्या प्रकारासाठी पब, क्लब, हुक्का, बार जबाबदार असल्याची शक्यता आहे. तरुणांसह अल्पवयीन मुले-मुलीही दारूच्या आहारी गेल्याचे उघडकीस आले आहे. या वाढत्या घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी आदेश काढत पब, क्लब, हुक्का, बारवाल्यांसाठी दिशानिर्देश जारी केले. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रवेश बंदी, २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणालाही मद्यबंदी आणि पहाटे दीड वाजता ‘सर्व बंद’ करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर कुणीही पार्टी करताना आढळले किंवा ग्राहकांना सेवा देताना दिसले तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

हेही वाचा >>> सरसकट अधिछात्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह; बार्टी, सारथी, महाज्योती संस्थांच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची मागणी

शहरातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी काही प्रमाणात बार, परमिट रूम, रेस्टॉरेंट जबाबदार असल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत. या प्रकारामुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे पोलीस आयुक्तांनी पत्रकात नमूद केले आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि शांतता सुनिश्चित करण्यासाठी पब, क्लब, हुक्का, रेस्टॉरेंट, बारवाल्यांकरिता दिशानिर्देश जारी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यात सर्व बार, परमिट रूम रात्री १.३० च्या वेळेचे काटेकोरपणे पालन करतील. त्याचबरोबर सर्व संगीत कार्यक्रम रात्री १.३० पर्यंत बंद होतील, अन्न आणि मद्य इत्यादीसाठी कोणतीही ऑर्डर घेणार नाही, रात्री १.३० वाजता बंद करण्याची वेळ निर्धारित केली आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ‘परमिट रूम’ जिथे दारू दिली जाते तिथे प्रवेश दिला जाणार नाही, २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला मद्य दिले जाणार नाही, ‘सिटिंग एरिया’मध्ये नाचण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जर गाणे, संगीताचे सादरीकरण असेल तर त्याची लेखी सूचना पोलिसांना देणे अनिवार्य राहणार आहे.

हेही वाचा >>> वाहनांचे स्वयंचलित चाचणी केंद्र तयार करण्यात परिवहन खाते अपयशी! राज्यात पुढचे सहा महिने मानवीय पद्धतीनेच चाचणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदेशी नृत्य कलाकार असतील तर १५ दिवसांअगोदर सूचना द्यावी लागणार आहे. ग्राहकांना बसण्याच्या जागेत नृत्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आस्थापनात सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत. लेखी परवानगीशिवाय बाऊन्सर म्हणून कोणालाही कामावर घेता येणार नाही, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे बाऊन्सर्स नेमता येणार नाहीत, बाऊन्सर्सचे चारित्र्य पडताळणी करणे गरजेचे राहणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था आवश्यक आहे. हे सर्व दिशानिर्देश ६ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत वैध राहणार असून त्यानंतर त्याला आवश्यकतेनुसार मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. या नियमावलीमुळे बार, रेस्टॉरेंट व पबचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.