सोनेगावमधून उचलबांगडी करून पाठवले मुख्यालयात

नागपूर : मुंबईतील अनेक पोलीस अधिकारी नागपुरात पदोन्नतीवर आले आहेत. त्यामुळे साहजिकच ते मुंबई व नागपुरातील कामात तुलना करीत असतात. ही तुलना व्यक्तिगत पातळीवर असेल तर ठीक आहे, मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही उत्तर देताना मुंबई तसे होते, असे होत नाही, अशाप्रकारची उत्तरे दिली गेली तर त्याचा विपरीत परिणाम होणारच. असाच एक प्रकार सोनेगावच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना चांगलाच नडला असून पोलीस आयुक्तांनी त्यांची उचलबांगडी केली आहे.

सोनेगावचे पोलीस आयुक्त के.एस. शेंगळे काही महिन्यांपूर्वीच नागपुरात रुजू झाले. त्यांनी मुंबईमध्ये मोठमोठय़ा प्रकरणांचा तपास केला आहे. मात्र, नागपुरात दाखल झाल्यानंतर त्यांना येथील कामाची पद्धत वेगळी असल्याचे वारंवार जाणवायला लागले. यासंदर्भात ते नेहमी कनिष्ठ व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मुंबई-नागपूर अशी तुलना करीत होते.

दरम्यान, नागपुरात पोलीस आयुक्त दर आठवडय़ाच्या मंगळवारी गुन्हे आढावा बैठक घेतात.

ही गोष्ट त्यांच्यासाठी होती. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात गुन्हे आढावा बैठकीला ते विलंबाने हजर झाले. नेहमीच विलंबाने येण्याच्या सवयीमुळे  पोलीस आयुक्तांनी त्यांना आतमध्ये घेतलेच नाही. त्यांना स्पष्टीकरण मागितले असता त्यांनी मुंबई व नागपूरमधील कार्यपद्धतीची तुलना केली.

ही बाब वरिष्ठांना न आवडल्याने १९ मे रोजी त्यांची उचलबांगडी करून मुख्यालयात पाठवण्यात आले.

शहरानुसार कामाची पद्धत बदलते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक पोलीस आयुक्तालय किंवा अधीक्षक कार्यालयांची कामाची पद्धत वेगळी असते. प्रत्येक क्षेत्राची रचना, स्थानिक लोक, त्यांची संस्कृती आणि गुन्हेगारीचे स्वरूप बघून काम करावे लागते. आपण पूर्वी काय केले, हे सांगण्यापेक्षा नवीन ठिकाणी तेथील कार्यपद्धतीनुसार कार्य करणे गरजेचे आहे. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने जीवनात हा पाठ अंमलात आणायला हवा.

 – डॉ. के. व्यंकटेशम,  पोलीस आयुक्त.