नागपूर : कौटुंबिक अत्याचार सोसत असलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिकांपासून ते पत्नी पिडीतांपर्यंत अनेकांसाठी भरोसा सेल महत्वाची भूमिका बजावत आहे. क्षुल्लक कौटुंबिक कारणांवरून उध्वस्त होऊ पाहणारे लाखो संसास भरोसा सेलच्या मदतीमुळे सावरत आहेत. २११७ मध्ये नागपूरने यशस्वी केलेला हा पथदर्श प्रकल्प २०१९ पासून राज्यात राबविला जात असताना या सेलच्या धर्तीवर ग्रामीण महिलांनाही समुपदेशन सेवा मिळावी, म्हणून आदिवासी दुर्गम भागातही भरोसा सेल विस्तारीकरणावर विचार केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोली, अमरावती आणि नागपूर पोलिस परिक्षेत्रातील ग्रामीण महिला पोलीस समुपदेशकांच्या तांत्रिक प्रशिक्षणाची जबाबदारी नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्राने स्विकारली आहे. या अंतर्गत ५० पोलिस अधिकारी आणि ५० महिला समुपदेशकांचे प्रशिक्षण शुक्रवारपासून सुरू होत आहे.
यात गडचिरोली, अमरावती आणि नागपूर पोलिस परिक्षेत्रा अंतर्गत ग्रामीण पोलिस दलातील महिला समुपदेशकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. भरोसा सेलमध्ये नियुक्त समुपदेशकांना विभागीय अथवा राज्य पातळीवर स्वरुपाचे एकत्रित प्रशिक्षण देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यात अमरावती, गडचिरोली आणि नागपूर असे तिन्ही पोलिस परिक्षेत्र आणि आयुक्तालयातील १४ युनिटमधील ५० अधिकारी आणि ५० समुपदेशक अशा १०० जणांना प्रशिक्षण मिळेल. यात ग्रामीण भागातल्या भरोसा सेलमध्ये नियुक्त होणारे १ प्रभारी अधिकारी आणि २ अंमलदार अशा तीन महिला पोलिस दलातील १०० समुपदेशकांना प्रशिक्षण दिले जाईल.
असे होईल प्रशिक्षण
जिल्हा पातळीवरील मध्यवर्ती भरोसा सेल मधून महिला, जेष्ठ नागरिक, बाल हक्क संरक्षण या तीन घटकांसाठी पोलीस मदत, समुपदेशन, मानसोपचार, वैद्यकीय सेवा, विधी सल्ला, संरक्षण आणि पूनर्वसन अशा सात सुविधा मिळतात. भरोसा सेलकडे मदत मागणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक अथवा पत्नीपिडीत हिंसाचार, छळ, तणाव, अत्याचार, अवहेलनेचे दुःख घेऊन येतात. या पिडीतांना समजून घेऊन त्यांचे समुपदेशन केले जाते. यासाठी काय काळजी घ्यावी, पिडीतांचा ताण हलका कसा करावा, त्यांना बोलते कसे करावे, नातेसंबंध टिकून रहावेत, यासाठी वादाची मानसशास्त्रीय उकल कशी करावी, स्वतःच्या ताणाचे व्यवस्थापन कसे करावे, याचे प्रशिक्षण दिले जाईल. यात समुदेशन, मानसोपचार, विधी क्षेत्रातील तज्ज्ञांसह पोलिस अधिकारी समुपदशकांना शास्त्रिय मार्गदर्शन करणार आहेत.
अत्याचाराची तक्रार घेऊन महिला जेव्हा ठाण्यात येते, तेव्हा पोलीस कायद्याच्या बाजूने विचार करतात. मात्र भरोसा सेल वेगळा आहे. समस्येवर सामोपचारातून तोडगा हे त्याचे उद्दिष्ट आहे. अशा वेळी पिडीतांना कसे हाताळावे, समजूत कशी काढावी, त्यांच्यातल्या गुंत्याची मानसशास्त्रिय उकल कशी करावी, सामोपचाराची भूमिका कशी घ्यावी याची माहिती नसते. पिडिताला मानसिक, कौटुंबिक, कायदेशीर, सामाजिक आधार हवा असतो. वाद हाताळताना सहनशीलता, सामोपचार, संवादाचे कौशल्य लागते. याचे समुपदेशकांना प्रशिक्षण मिळेल. रिना जनबंधू, प्राचार्या पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर