नागपूर : राज्यात सरकार किंवा भाजपविरोधात बोलणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांवर शासकीय तपास यंत्रणा सक्रिय होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नुकत्याच नागपूरमध्ये झालेल्या दोन मोठ्या मोर्चांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या शासन निर्णयाच्या (जी.आर.) विरोधात काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये मोठा मोर्चा काढला. मात्र, या मोर्चाच्या एक दिवस आधीच त्यांना आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे सरकारविरोधी भूमिका घेताच तपास यंत्रणा सक्रिय होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन केले. या आंदोलनानंतर अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यात अवैधपणे बंगला, फार्महाऊस, कारखाना तसेच मुंबई आणि नागपूरमध्ये संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे.

या घटनांमुळे विरोधकांवर सरकारी यंत्रणा वापरून दबाव आणला जात असल्याचा आरोप पुन्हा जोर धरत आहे. नागपूरमधील या दोन मोर्चांच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान पुन्हा वाढले असून विरोधकांनी सरकारवर ‘सूडराजकारणा’चा आरोप केला आहे.मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामील करण्यासाठी राज्य सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयाविरोधात आवाज उठवणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

वडेट्टीवार यांनी १० ऑक्टोबर रोजी नागपुरात मोठा ओबीसी मोर्चा आयोजित केला होता. मात्र, या आंदोलनाच्या एक दिवस आधी (९ ऑक्टोबर) त्यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली. परंतु, वडेट्टीवार आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्याची वाच्यता देखील केली नाही आणि आंदोलनाची तयारी सुरूच ठेवली. ओबीसींचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आयकर विभागाला नोटीस पाठवण्यास भाग पाडले, असा आरोप वडेट्टीवार यांनी आता केला आहे. ही नोटीस म्हणजे ओबीसी आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न आहे. मात्र आम्ही गप्प बसणार नाही. शेतकरी, आदिवासी आणि कामगार वर्गाच्या न्यायासाठी आमचा लढा सुरूच राहील, असा निर्धार वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील बेलोरा गावातून शेतकऱ्यांसह महाएल्गार पुकारत बच्चू कडू यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला. अमरावती, वर्धा जिल्ह्यातील गावागावांतून मार्गक्रमण करीत हा मोर्चा नागपूरच्या वेशीवर धडकला. हजारोंच्या संख्येतील शेतकऱ्यांचे वादळ पाहून सरकारला धडकी भरली.शेतकऱ्यांसाठी अशा पद्धतीची ही पहिलीच बैठक झाली. राज्यातील प्रत्येक गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी योजना ठरवली. सरकारकडून ती मान्य करून घेतली.यातूनच ३० जून २०२६ ची तारीख निश्चित झाली. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, असे आंदोलकांनी सांगितले.