नागपूर : नागपूर हिंसेतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सोमवारी सकाळी महापालिकेने बुलडोझरने कारवाई केली. महापालिकेने शुक्रवारी फहीम खानला नोटीस दिली होती आणि सोमवारी अतिक्रमणाची कारवाई केली. यानंतर फहीम खानच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने या प्रकरणात झालेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. बुलडोझर कारवाई ही भेदभावपूर्वक आहे. लक्ष्य करण्याच्या हेतूने ही कारवाई झाली आहे, असे प्राथमिक निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. न्यायालयाने याप्रकरणी पुढील कारवाईवर स्थगिती देण्याचे आदेशही दिले. याशिवाय राज्याचे मुख्य सचिव यांना सर्वोच्च आदेशाच्या अवहेलना प्रकरणात जबाब नोंदविण्याचे निर्देश दिले.

महापालिकेकडून लगेच कारवाई

महाल परिसरातील दंगलीचा कथित मास्टर माईंड फहिम खान यांच्या घरावर नागपूर महापालिका प्रशासनाने बुलडोझरची कारवाई सोमवारी सकाळी १० च्या सुमारास सुरू केली. यशोधरानगर ठाण्याच्या हद्दीतील संजय बाग कॉलनी येथील दोन मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम पडण्याचे काम सुरू झाले आहे. महापालिकेने काल त्याच्या घरावर अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची नोटीस बजावली होती. २४ तासांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक संजय बाग कॉलनीत धडकले. वीज वितरण कंपनीने वीज जोडणी तोडण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश काय?

एखादी व्यक्ती गुन्ह्यातील आरोपी आहे म्हणून त्या व्यक्तीच्या मालमत्तेवर बुलडोझरने पाडकाम करणं हे घटनाविरोधी असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. राजस्थान व मध्य प्रदेशमधील अशा प्रकारच्या कारवायांविरोधात दाखल याचिकांवर सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला होता. मात्र सोमवारी सकाळी नागपूर हिंसेतील मुख्य आरोपी फहीम खान यांच्या घरावर बुलडोझरने कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. अशी कारवाई घटनाविरोधी ठरवतानाच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याला त्यासाठी दोषी धरले जावे, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायमूर्ती बी. आर. गवई व न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने नियमावली तयार करून दिली होती. उत्तर प्रदेशमध्ये दंगेखोरांची कंबर तोडण्यासाठी त्याच्या घरावर बुलडोजर चालवण्यात येते. त्यामुळे नागपुरातही दंगेखोरांच्या घरावर बुलडोजर चालणार का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला होता. त्यावर ‘दंगेखोरांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. त्यांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात येईल,’ अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर महापालिकेने लगेच फहीम खानच्या कुटुंबीयांना अतिक्रमणबाबत नोटीस दिली होती. सोमवारी अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली.