नागपूर : हवालीचा व्यवहार करत असलेल्या एका व्यापाऱ्यावर रात्री९ च्या सुमारास घरी निघालेल्या पाळतीवरील दोघांनी अंदाधुंद गोळीबार करीत व्यापाऱ्याकडील ५० लाख रुपयांची रोकड पळवली.
जरिपटका येथील कडवी चौकालगत १० नंबर पुलिया परिसरात रात्री ९ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. राजेंद्र दिपानी असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. धान्य व्यापारी असलेले राजेंद्र हे हवालाचाही व्यवसाय करतात अशी माहिती पोलिसांनी दिली. रात्री रोजचा आर्थिक व्यवहार करून ते घरी निघाले होते.
त्यांच्याकडे मोठ्या स्वरुपात रोकड असल्याची माहिती असल्याने ते नेहमीच्या मार्गाने घरी जाणार असल्याची हल्लेखोरांना माहिती होती. ते राजेंद्र दिपानी यांच्या मागावरच होत.दिपानी १० नंबर पुलियावर पोचताच अंधारात हल्लेखोरांनी त्यांच्यावर ३ गोळ्या झाडल्या. यातली २ गोळ्या दिपानी यांच्या लागल्या. त्यानंतर हल्लेखोर ५० लाखाची रोकड घेऊन पळाले.
दिपानी यांना प्रथम २ लाख नंतर ५ लाख आणि रात्री उशिरा ५० लाख लुटले गेले असे सांगितले. जखमी अवस्थेत त्यांना अभिनव रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना मॅक्स मल्टिस्पेशालीटी रुग्णालयाला हलवले आहे. तेथील अतिदक्षता विभागात दिपानी यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी न्यायवैदयक टीमसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पथकांना अलर्ट जारी केला आहे.