नागपूर: ‘छावा’ या छत्रपती संभाजी महाराजांवरील चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा रंगली होती. छावा या सिनेमाने रिलीज झाल्यापासूनच्या प्रत्येक विकेंडमध्ये कमाईच्या बाबतीत नवे विक्रम केले. या चित्रपटानंतर संभाजी महाराजांच्या जीवनातील अनेक माहिती लोकांपर्यंत पोहचली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी छावा चित्रपटाविषयी एका भाषणात उल्लेख केला. त्याचा काय संदर्भ होता पाहूया.

नागपूरमधील धर्मजागरण न्यासच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. जीवन कसे जगावे हे लोकांना माहिती नसल्यामुळे जगामध्ये आज संघर्ष सुरू आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे हिंदू धर्माची सर्व जगाला गरज आहे.

हिंदू धर्म मानव धर्म असून जगाने स्वीकारावा असा आहे. समाज आणि राष्ट्रसेवा करणारा हाच खरा धर्म आहे, असा आदर्श जगासमोर उभा केला तरच सर्व त्याचा स्वीकार करतील. तेव्हा धर्मग्रथांचीही गरज पडणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते पुढे म्हणाले, धर्माचे कार्य नेहमी पवित्र राहते. धर्मावर कुणी अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तो सत्य आहे. ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण असूनही दिसत नाही तसाच आपला हिंदू धर्म सत्य आहे. जीवनात नैराश्य येणारे लोक धर्माचा मार्ग सोडतात. मात्र, ज्यांच्यात पुरुषार्थ असतो ते कधीही न थकता आपल्या धर्मासाठी काम करतात.

महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात अनेक संकटे आली. परंतु शक्ती आणि युक्तीचा वापर करून त्यांनी आपली कर्तव्य केली. हिंदू धर्म सर्व विविधतांना एकत्र घेऊन चालणारा धर्म आहे. त्याचे जागरण प्रत्येक हृदयात व्हायला हवे. धर्मजागरणातूनच जगाला गरज असणाऱ्या मानव धर्माचा म्हणजेच हिंदू धर्माचा आदर्श उभा करता येईल. यातून समाज आणि राष्ट्रासाठी काम करणारा हिंदू धर्म आहे हे जगाला दिसेल, असेही ते म्हणाले. धर्माचे कार्य केवळ देवासाठी नाही तर समाजासाठीही राहते. धर्म चांगला असेल तर समाज चांगला राहिल, असेही भागवत म्हणाले.

छावा विषयी नेमके काय म्हणाले?

मनुष्य आपले कर्तव्य करत राहावा, आपल्या धर्मावर पक्का राहावा म्हणून त्याच्या मनात धर्माबद्दल निष्ठा असणे आवश्यक आहे. आपल्या देशाचा इतिहास पाहिला असता धर्मासाठी कितीतरी लोकांनी बलीदान दिले. अनेकांचे मुंडके छाटले मात्र, धर्म सोडला नाही. छावा चित्रपट प्रत्येकाने पाहिला. धर्माविषयी जाज्वल्य निष्ठा होती म्हणून ते करू शकले. आमला धर्म हा सत्यावर आधारित आहे, हा विश्वास असल्याने त्यांनी धर्मरक्षणसाठी बलिदान दिले, असेही डॉ. भागवत म्हणाले.