scorecardresearch

‘आरटीओ’ लाच प्रकरण: लाचखोर खोडेचे मंत्रालयापर्यंत धागेदोरे; खाडे, बुंदेलेंच्या संपर्कात?

लाच घेणारा दिलीप खोडे हा मंत्रालयात वावर असलेल्या लक्ष्मण खाडे आणि सुरेश बुंदेले यांच्या संपर्कात होता. त्यामुळे नागपूर आरटीओ लाच प्रकरण, बदल्यांमध्ये या तिघांचा काही संबंध आहे का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

nagpur RTO bribery case
‘आरटीओ’ लाच प्रकरण: लाचखोर खोडेचे मंत्रालयापर्यंत धागेदोरे; खाडे, बुंदेलेंच्या संपर्कात? (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या नावाने धमकावत नागपूर (शहर) आरटीओ अधिकाऱ्याकडून २५ लाख रुपये लाच घेणारा दिलीप खोडे हा मंत्रालयात वावर असलेल्या लक्ष्मण खाडे आणि सुरेश बुंदेले यांच्या संपर्कात होता. त्यामुळे नागपूर आरटीओ लाच प्रकरण, बदल्यांमध्ये या तिघांचा काही संबंध आहे का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लक्ष्मन खाडे हे परिवहन खात्यातून मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झाले, तर सुरेश बुंदेले हे धर्मरावबाबा आत्राम व इतरही काही राज्यमंत्र्यांकडे स्विय सहाय्यक होते. ८ मार्चला नागपुरातील एका हाॅटेलात खाडे थांबले असताना पूर्व विदर्भातील आरटीओच्या बऱ्याच अधिकाऱ्यांनी हाॅटेलमध्ये बदल्यांच्या मोर्चेबांधणीसाठी तेथे गर्दी केल्याची चर्चा रंगली होती.

हेही वाचा – वीज दरवाढीचा शॉक! ग्राहकांवर वीज वापरासाठी किती पडणार भुर्दंड जाणून घ्या..

या प्रकरणात नागपूर पोलिसांनी चौकशीही सुरू केली होती. परंतु पुढे काय झाले, हे पोलिसांकडून स्पष्ट केले गेले नाही. दरम्यान, २८ मार्चला नागपुरात आरटीओ अधिकाऱ्याकडून २५ लाख रुपयांची लाच घेताना खोडे याला एसीबीने अटक केली. खोडे सातत्याने लक्ष्मण खाडे आणि सुरेश बुंदेले यांच्या संपर्कात असल्याने तिघांचा काय संबंध, याचीही एसीबीकडून चौकशी होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या विषयावर सुरेश बुंदेले यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. एसीबी नागपूरचे अधिकारी म्हणाले, चौकशी सुरू असून तपासात पुढे येणारी माहिती न्यायालयासमोर ठेवली जाईल.

‘‘मी परिवहन खात्यात असताना दिलीप खोडे आणि सुरेश बुंदेले हे दोघेही परिवहन राज्यमंत्र्यांकडे स्विय सहाय्यक होते. त्यामुळे दोघांना मी ओळखतो, परंतु त्यांच्याशी माझा संबंध नाही. मध्यंतरी एखादवेळी ते माझ्याशी बोलले. परंतु नागपुरातील लाच वा बदल्यांशी संबंधित प्रकरणाशी माझे देणे-घेणे नाही.”, असे मुंबई, सेवानिवृत्त परिवहन अधिकारी लक्ष्मण खाडे म्हणाले.

हेही वाचा – पवार म्हणतात, “सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही”; विरोधी पक्षाला वाद टाळण्याचा सल्ला

खोडेकडून १५ लाख जप्त

दिलीप खोडे याच्याकडून पोलिसांनी १५ लाख रुपये रोख जप्त केले. त्याने ती रक्कम शेजाऱ्याच्या घरात लपवून ठेवली होती. खोडेला आज न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाने ८ एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. खोडेच्या मोबाईलमध्ये काय दडलेय आणि लाच घेण्यापूर्वी खोडेने कुणाशी संपर्क केला होता, याबाबत तपास सुरू आहे. खोडेच्या घरातून काही महत्वपूर्ण दस्तावेज जप्त केले असून, त्यामधून काही सुगावा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरा आरोपी भोयर अद्यापही फरार आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 13:19 IST

संबंधित बातम्या