नागपूर : पोळ्याच्या दिवशी ग्रामीण भागात जुगार खेळण्याची कू -प्रथा पाळली जाते. त्याच पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी खेड्यापाड्यात चालणाऱ्या ४७हूनअधिक जुगार अड्डे तान्हा पोळाच्या दिवशी उधळून लावले. या खेरीज नव्यानेच शहर पोलीस आयुक्तालयाशी जोडल्या गेलेल्या खापरखेडा हद्दीतील गुमथळा, चनकापूर, दहेगाव रंगारी येथेही सुरू असलेले तीन जुगार अड्डे पोलिसानी उध्वस्त केले.
या कारवायांमध्ये पोलिसांनी २०० हून अधिक जुगारींना अटक करीत त्यांच्याकडून हजारो रुपयांची रोख आणि वाहने जप्त केली. गुन्हे शोध शाखा पाचच्या पथकाने शनिवारी खापरखेडा हद्दीत जुगार अड्यांवर कारवाई करत १६ हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी एक कार, जुगारींच्या २६ दुचाकी आणि भ्रमणध्वनी संच जप्त केले.गुन्हे शोध शाखेच्या पथकाने गुमथळा येथे टाकलेल्या छाप्ताय सुंदरलाल मसराम विखे, मुकेश कृष्णा ढोबळे, अर्जून रघूनाथ झुंबळे, पवन राध्येश्याम शर्मा, राहूल रत्नाकर जगताप, प्रकाश आनंदराव नागले, मोहित नवलकिशोर चांडक, शुभम दिपक मिश्रा या सात जणांवर गुन्हे दाखल केले. याठिकाणाहून सर्वाधिक १७ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.
खापरखेडा पोलिसांनी मौजा शिवनगर हद्दीतील चनकापूर येथे छापा टाकत जुगार खेळणाऱ्या ओमप्रकाश नत्थुजी चौरागडे, जयकुमार गजानन बानेवार, राजेश रामलखन सुर्यवंशी, सोनू नंदनला सिंग याच चौघांवर गुन्हे दाखल करीत ३ दुचाकी जप्त केल्या. दगेगाव परिसरातल्या दर्शन लॉनमध्ये सुरू असलेला जुगाराचा तिसरा अड्डाही खापरखेडा पोलिसानी उधळून लावला. या ठिकाणाहून पोलिसांनी आशीष नत्थूजी कासमगोतरे, अलंकार भास्कर कावळे, सच्चिदानंद रघुनाथ ढवळे यांना अटक केली. अंधाराता फायदा घेत अन्य जुगारी पळून गेले. पोलिसांनी या ठिकाणाहूनही ६ दुचाकी जप्त केल्या.
ग्रामीणमधील ४७ जुगार अड्डे उधळले
नागपूर ग्रामीण पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कळमेश्वर, जलालखेडा, नरखेड, कन्हान, पारशिवनी, रामटेक, काटोल, कोंढाळी, टाकळघाट, कुही, भिवापूर, उमरेड आणि बुटीबोरी एमआयडीसी अशा विविध पोलीस ठाण्यांनी तान्हा पोळ्याच्या दिवशी ४७ जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. पोलिसांनी या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या १८७ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून जवळजवळ २० हजारांची रोख जप्त केली. या घडामोडीत शहराच्या हद्दीतील वाडी पोलिसांनी सुनंदा मोबाईल दुकानाशेजारील गणेश डेअरीच्या आड सुरू असलेला जुगार अड्डाही उद्ध्वस्त केला. पोलिसांनी या ठिकाणाहून पत्त्यांवर जुगार खेळणाऱ्या १० जणांवर गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून ३४ हजारांची रोख रक्कम आणि ८ भ्रमणध्वनी संच जप्त केले.