नागपूर : नागपूर ग्रामीण ‘आरटीओ’मध्ये बनावट कागदपत्रावरून परराज्यातील वाहन नोंदणी प्रकरणात काही अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. २०१९ पासून या कार्यालयात नोंदणी झालेल्या कागदपत्रांची परिवहन आयुक्तांनी पाठवलेल्या समितीकडून तपासणी सुरू आहे. परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांच्या नेतृत्वात नागपूर ग्रामीण आरटीओतील बनावट कागदपत्रावरून मालवाहू वाहनांची नोंदणी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार ३० एप्रिलपासून शिंदे समिती नागपुरात ठाण मांडून आहे.

गुरुवारी चमूने आरटीओ कार्यालय गाठत या कागदपत्रांची तपासणी व त्यांची प्रत गोळा करणे सुरू केले. या कागदपत्रांसह ऑनलाईन नोंदणीची पडताळणी केली जाणार आहे. सोबतच वाहनांचे इंजिन क्रमांक व चेचीस क्रमांकाची नोंदणी संबंधित कंपनीला पाठवून वाहन संबंधिताच्या नावानेच आहे की नाही याची खात्री केली जाईल. त्यानंतर बनावट कागदपत्राला जबाबदार कोण, हे शोधण्याचा प्रयत्न समितीकडून होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या विषयावर नागपूर ग्रामीण आरटीओतील एकही अधिकारी बोलायला तयार नाही. चौकशी समितीचे प्रमुख शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी गोपनीय बाब असल्याने त्यावर बोलणे योग्य नसल्याचे सांगितले.

हेही वाचा : वाशिम : लग्नसमारंभासाठी जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात दोन ठार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरण काय?

पुणे पोलिसांना पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती हद्दीत दोन चोरीची जड वाहने आढळली. तपासणीत बनावट कागदपत्रावरून या वाहनांची नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात नोंदणी झाल्याचे पुढे आले. त्यानंतर पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेचे एक अधिकारी व कर्मचारी असलेले पथक नागपूर ग्रामीण आरटीओत आले. सदर पथकाने आरटीओ अधिकाऱ्यांना गेल्या तीन वर्षांत सगळ्याच वाहनांच्या नोंदणीची कागदपत्रे मागितली. परंतु, कागदपत्रे खूपच जास्त संख्येने असल्याचे बघत शेवटी नागालॅन्ड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, हिमाचल प्रदेश या चार राज्यातील वाहनांच्या नोंदणीची सुमारे ५० ते ६० वाहनांचे कागदपत्रे या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतली. त्यानंतर हे पथक पुन्हा पुण्याकडे रवाना होणार असल्याचे संकेत होते.