नागपूर :सीताबर्डी किल्ला सुरक्षा व इतर कारणास्तव नियमितपणे पर्यटकांना अद्याप प्रवेश नव्हता. नवीन पिढीला आपल्या नागपूर शहरातील वैभवशाली ऐतिहासाची माहिती व्हावी, या उद्देशाने पर्यटन खात्याचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे व भारतीय सशस्त्र सेनेचे मुख्यालय प्रमुख मेजर जनरल एस. के. विद्यार्थी यांच्‍या संयुक्‍त पुढाकाराने सीताबर्डी किल्ला पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

त्‍याअनुषंगाने, सीताबर्डी किल्ला सहलीचे आयोजन करण्‍यात येत असून मागील सहलीला पर्यटकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला. यातील दुसरा टप्‍पा शनिवार, १० मे रोजी सकाळी ८. वाजता सीताबर्डी किल्ला येथून सुरू होईल. महामंडळाच्या प्रशिक्षित गाईड मार्फत किल्ल्याची माहिती देण्यात येणार असून लष्कराचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहे.

महामंडळामार्फत सीताबर्डी किल्ला सहल नियमितपणे प्रत्येक महिन्याचा दुस-या शनिवारी आयोजित केली जाणार असल्‍याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी कळवले आहे. या सहलीचा जास्तीत जास्त पर्यटकांनी लाभ घ्‍यावा व अधिक माहितीकरिता समन्वय अधिकारी सुनिल येताळकर, मो. क्र. 9021515519 व श्रीमती वैशाली भांडारकर मो. क्र.9503966877 व ई-मेल ronagpur@maharashtratourism.gov.in यांच्याशी पर्यटकांनी सविस्तर माहितीकरीता संपर्क साधावा.

नागपुरात मध्यभागी सीताबर्डी किल्ला आहे. एक प्रमुख पर्यटन स्थळ अशी या किल्ल्याची ओळख आहे. तो जनतेसाठी खुला करावा अशी मागणी आहे. परंतु तो स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिन अशा मोजक्याच दिवशी खुला केला जातो.