नागपूर: मध्य भारतातील वैद्यकीय हब म्हणून ओळख असलेल्या नागपुरातील विविध सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये मानसाच्या छातीसह वेगवेगळ्या भागातून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे लहान- मोठ्या गाठी काढून जीवदान दिल्याच्या घटना आपण अनेक बघत असतो. परंतु नागपुरातील एका भटक्या श्वानाच्या छातीत तब्बल ३.५ किलोची गाठ असल्याचे निदान झाले. त्यानंतर झालेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेबाबत आपण जाणून घेऊ या.
उपराजधानीत मोठ्या संख्येने भटके श्वान वेगवेगळ्या भागात फिरतांना दिसतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून संतापही व्यक्त केला जातो. दरम्यान नागपूर महापालिकेकडून या श्वानांसाठी वेगवेगळ्या भागात शेल्टरची सोय केली गेली आहे. या शेल्टरमध्ये श्वानांवर उपचारासह ठेवण्याची सोयही उपलब्ध आहे. दरम्यान महापालिकेच्या धरमपेठ झोन परिसरात एक श्वान आजारी अवस्थेत असल्याचे महापालिकेच्या चमूला आढळले. या श्वानाला पकडून भांडेवाडी पशु निवारा केंद्रात आणले गेले. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत श्वानाच्या उजव्या बाजूच्या छातीच्या खालच्या भागावर मोठी गाठ असल्याचे निदान झाले.
दरम्यान डॉ. सनी मगर व त्यांच्या वैद्यकीय पथकाने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी शस्त्रक्रियेतून ही ३.५० किलोची गाठ काढण्यात यश मिळाले. शस्त्रक्रियेनंतर श्वानाची देखरेख केली जात असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. हा श्वान बरा होण्याच्या मार्गावर आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त राजेश भगत व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ गजेंद्र महल्ले यांच्या देखरेखीत भांडेवाडी येथील पशु निवारा केंद्रात या श्वानावर विशेष लक्ष देऊन उपचार केले जात आहे. या केंद्रात तज्ञ डॉक्टरांची चमू कार्यरत आहे.
अपघातात हाड मोडलेले श्वान…
भांडेवाडी पशुनिवार केंद्र मध्ये मोठ्या प्रमाणावर भटके श्वान आणले जातात. त्यापैकी अनेक अत्यंत गंभीर अवस्थेत असतात. यामध्ये वाहन अपघातात अनेक हाडे मोडलेले, व्हेनरल ग्रॅन्युलोमा, लकवा, अशक्तपणा आणि वार्धक्याशी संबंधित गुंतागुंतीने त्रस्त झालेल्या श्वानांचाही समावेश आहे. दरम्यान भांडेवाडीतील शेल्टर अशा प्राण्यांना सुरक्षित आश्रय देण्याबरोबरच वेळेवर पशुवैद्यकीय उपचार व पुनर्वसन करण्याचे कार्य करते.
श्वानांना अळ्यांनी भरलेल्या जखमा
पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर लगेचच मोठ्या प्रमाणावर भटक्या श्वानांना अळ्यांनी भरलेल्या जखमा (मॅगॉट इन्फेस्टेड वुंड्स) होतात आणि अशा अवस्थेत ते भांडेवाडी शेल्टरमध्ये आणले जातात. या जखमा खोल, मोठ्या आणि गंभीर स्वरूपाच्या असतात. माशांच्या अळ्यांमुळे झालेल्या या जखमांमुळे तीव्र वेदना, ऊतकांचे नुकसान आणि वेळेवर उपचार न केल्यास जीवघेणी संसर्गजन्य स्थिती (सेप्सिस) निर्माण होऊ शकते. त्यावरही भांडेवाडीतील केंद्रात उपचार केले जातात.