नागपूर : पाण्यात पडल्यावर आपोआप पोहणे येते, असे सहसा म्हटले जाते, पण प्रत्येकाच्याच बाबतीत हे खरे होईलच असे नाही. हे माणसांच्या बाबतीत जेवढे लागू होते, तेवढेच प्राण्यांच्याही बाबतीतसुद्धा. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील असाच एक व्हिडिओ सहाय्यक वनसंरक्षक स्वप्नील भोवते यांनी चित्रित केला आहे. यात वाघिणीचा एक बछडा बिनधास्तपणे पाण्यात पोहतो आहे, तर दूसरा मात्र पाण्यात उतरायला देखील घाबरत आहे. भीतभीत तो पाण्यात उतरतो खरा, पण उतरल्यानंतरही त्याची भीती काही कमी होत नाही.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या करामती वन्यजीव छायाचित्रकार अलगद कॅमेऱ्यात कैद करतात. आता तर पावसाळी सुट्या संपून ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे कोअर क्षेत्रही पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात ताडोबाच्या कोअरपेक्षा बफर क्षेत्रातील वाघांनीच पर्यटकांना वेड लावले आहे. ‘छोटा मटका’ हा बफरचा अनभिषिक्त सम्राट आता जेरबंद आहे. दुसऱ्या वाघासोबत झालेल्या लढाईत त्या वाघाला त्याने ठार केले असले तरीही तो देखील गंभीर जखमी झाला. अंगभर जखमा आणि पाय फ्रॅक्चर होण्यासोबतच शिकारीसाठी वापरणारे त्याचे सुळे देखील तुटले. त्यामुळे उपचारासाठी त्याला जेरबंद करण्याचा निर्णय वनखात्याला घ्यावा लागला.
ताडोबाच्या याच बफर क्षेत्रातील एक व्हिडिओ सहाय्यक वनसंरक्षक स्वप्नील भोईते यांनी चित्रीत केला आहे. ताडोबा बफरच्या मामला गेटजवळ एका पाणवठ्यात ‘टी २०२’ नावाच्या गौरी वाघिणीच्या दोन नर बछड्यांची पाण्यातील मस्ती समोर आली आहे. या वाघिणीचा एक बछडा आधीच पाण्यात उतरला आहे आणि पाण्यात उतरुन तो स्वैरपणे विहार करतो आहे. तो त्याच्या भावालाही पाण्यात उतरण्यासाठी आग्रह करतो आहे, पण त्याची पाण्यात उतरण्याची हिंमतच होत नाही. तो पाणवठ्याच्या काठावर चक्कर मारतो आणि पाण्यात कसे उतरता येईल याचा अंदाज घेतो.
ताडोबा बफरच्या मामला गेटजवळ एका पाणवठ्यात ‘टी २०२’ नावाच्या गौरी वाघिणीच्या दोन नर बछड्यांची पाण्यातील मस्ती समोर आली आहे.https://t.co/2jrmCKw8Ui#tiger pic.twitter.com/yKwXXzUSAr
— LoksattaLive (@LoksattaLive) October 29, 2025
शेवटी तो निर्णय घेतो आणि हळूहळू एक पाऊल टाकत कसाबसा पाण्यात उतरतो, पण तो पाणवठ्याचा किनारा काही सोडत नाही. शेवटी त्याचा भाऊ त्याला पाण्यात आत ओढतो, पण तो पुन्हा किनाऱ्याकडे जायला निघतो. दोन भावांमधील हा खेळ कितीतरी वेळ चालतो, पण दुसऱ्याची पाण्यातील भीती काही कमी होत नाही.अतिशय मजेदार असणारा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. उन्हाळा कधीचाच संपला आहे आणि पावसाळा देखील संपला आहे, पण पाऊस मात्र थांबायला तयार नाही. एकीकडे थंडीची प्रतिक्षा असताना उकाडा मात्र कमी व्हायला तयार नाही. अशातच पाणवठ्यातील एकाच वाघिणीच्या दोन बछड्यांमधील हा व्हिडिओ मात्र चांगलाच चर्चेत आहे.
