बुलढाणा : शाळेतच भोवळ येऊन खाली कोसळलेल्या शिक्षकाचा करुण अंत झाला. त्यांना मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी बेशुद्ध अवस्थेत नजिकच्या खाजगी रुग्णलयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.ही खळबळजनक व तितकीच दुर्दैवी घटना लोणार तालुक्यातील गुंधा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत घडली. शनिवारी घडलेल्या या घटनेने शाळेत एकच खळबळ उडाली. शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांना धक्का बसला तर चिमुकले विध्यार्थी गहिवरून रडकुंडीला आल्याचे चित्र होते.यामुळे सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.
मुकिंदा नारायण डाखोरे (वय ५३ वर्ष ) असे या अकाली निधन झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते गुंधा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेवर कार्यरत होते. शनिवारी त्यांनी नेहमीप्रमाणे मोटरसायकलने गुंधा हे गाव गाठले. वर्गावर जाऊन शिकवण्यास सुरुवात केली. दरम्यान आठव्या वर्गावर भूगोलचा तास घेण्यासाठी गेले. मुलांना शिकवून गृहपाठ दिला. त्यानंतर ऑफिसमध्ये येऊन स्कॉलरशिपसाठी लागणारे कागदपत्रे तयार करीत असताना इतर शिक्षकांच्या देखत त्यांना भोवळ आल्याने ते खाली कोसळले . शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षकांनी त्यांना उचलून मेहकर येथे खाजगी दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शिक्षक डाखोरे हे मेहकर तालुक्यातील ग्राम चिंचाळा येथील रहिवासी होते. यापूर्वी ते मेहकर तालुक्यातील मादणी येथे कार्यरत होते. मागील १० सप्टेंबरला झालेल्या बदल्यामध्ये त्यांची बदली लोणार तालुक्यातील गुंधा या गावात झाली होती. ते ११ सप्टेंबर रोजी शाळेवर रुजू झाले. नवीन जागेत रुजू होऊन जेमतेम पंधरा दिवस झालेले असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. गुंधा गावासाह त्याच्या मूळ गावी आणि मेहकर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षक आणि शैक्षणिक वर्तुळ हादरल्याचे चित्र आहे.