शासकीय नोकरी करण्यासाठी पैसे भरूनही नोकरी न मिळाल्याने एका युवकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचा तोतया अधिकारी बनण्याची शक्कल लढवली व राज्यभर फसवणूक करण्याचा सपाटा लावला. नागपुरातील एका व्यवसायिकाला दारूचा परवाना देण्याच्या नावावर फसवताना पोलिसांनी त्याला अटक केली. शुभम नंदीश्वर शहा (२९, रा. तरडगाव, ता. फलटन, जि. सातारा) असे आरोपीचे नाव आहे.
संकेत राजेंद्र बेले (२१) याचे छोटा ताजबाग येथे ओम ताजसाई इंटरप्रायजेस नावाचे डीटीपी आणि झेरॉक्सचे दुकान आहे. १८ मे २०२२ रोजी शुभम शहा संकेतच्या दुकानात झेरॉक्स काढण्यासाठी आला. त्याच्या देहबोलीतून तो मोठा अधिकारी असावा असे संकेतला वाटले. संकेतने त्याला विचारणा केली असता शुभमने सांगितले की, ‘मी राज्य उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक होतो. काही दिवस नोकरी केल्यानंतर सोडली’ माझ्याकडे देशी दारू दुकानाचे खूप परवाने आहेत आणि ते विकायचे आहेत असे संकेतला सांगितले. त्यावर संकेतने दारूचा परवाना विकत घेतो,असे शुभमला सांगितले. यानंतर घरमालक, संकेत आणि शुभम यांच्यात बोलणी झाली. त्यावेळीही शुभमने दारू दुकानाचा परवाना देतो असे आमिष दाखविले होते.
शुभमने अडीच लाखांची मागणी केली. त्यामुळे संकेत यास संशय आला. त्याने नेटवरून त्याचा शोध घेतला असता त्याच्यावर पुणे येथे गुन्हा दाखल असल्याचे लक्षात आले. फसवणूक होत असल्याचे संकेतच्या लक्षात येताचत्याने सक्करदरा पोलिसांना ही माहिती दिली.