नागपूर : व्हिएनआयटी परिसरातून बुधवारपासून वाहतूक सुरु झाली असली तरी अंबाझरीतील वाहतूक कोंडी अद्यापही कायम आहे. सकाळी दोन तास तर सायंकाळी दोन तास असा इतका कमी वेळ रस्ता खुला राहणार आहे. आज अनेक वाहनचालकांची सकाळी धावपळ झाली.

गेल्या महिन्याभरापासून अंबाझरी तलावाजवळील पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे अंबाझरी टी-पॉईंट ते विवेकानंद स्मारक दरम्यानचा मार्ग बंद करण्यात आला आहे. परिणामी अंबाझरी परिसरातील पर्यायी रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. व्हिएनआयटी प्रवेशद्वार उघडण्याचा पर्याय असल्यामुळे पोलीस, जिल्हाधिकारी आणि महापालिकेकडून व्हिएनआयटीकडे प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, व्हिएनआयटीने सुरुवातीला प्रस्ताव धुडकावून लावत प्रवेशद्वार उघडण्यास नकार दिला. या प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रशासनाला मौखिक आदेश देऊन व्हिएनआयटीचे प्रवेशद्वार सोमवारी उघडण्याचे आदेश दिले. मात्र, सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस व्हिएनआयटीच्या आतमधील रस्त्याचे बांधकाम सुरु होते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दोन दिवस रस्ता खुला झाला नव्हता. तिसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी दोन तासांसाठी (९.३० ते ११.३० पर्यंत) व्हिएनआयटीचे प्रवेशद्वार सामान्य नागरिकांसाठी उघडण्यात आले. यावेळी वाहतूक शाखेचे प्रमुख अधिकारी पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, सोनेगाव वाहतूक विभागाचे प्रमुख विनोद चौधरी स्वतः उपस्थित होते. सकाळी साडेनऊ वाजता वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत प्रवेशद्वार उघडण्यात आले. दोन तासात जवळपास दोनशेवर वाहन चालकांनी व्हिएनआयटीच्या परिसरातून रस्ता पार केला. प्रवेशद्वार सुरु झाल्यामुळे आयटी पार्क चौक, माटे चौक ते अभ्यंकरनगर चौकापर्यंत वाहतूक कोंडी होणार नाही, असे वाटत होते. मात्र, वाहतूक कोंडी कायम होती. त्यामुळे व्हिएनआयटीतील एक प्रवेशद्वार उघडून काहीही साध्य झाले नसल्याचे पहिल्या दिवशी दिसत होते.

हेही वाचा – “उद्धव ठाकरे यांना उमेदवार मिळणार की नाही याची चिंता”, उदय सामंत यांची टीका

वाहतुकीच्या कोंडीपेक्षा वेळ महत्वाची

बुधवारी सकाळी अगदी साडेनऊच्या ठोक्याला व्हिएनआयटीचे प्रवेशद्वार उघडण्यात आले. अनेक वाहनचालकांना प्रवेशद्वार सुरु झाल्याची कल्पना नव्हती. त्यामुळे पहिल्या तासात पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, तासाभरानंतर अनेक वाहनचालकांनी नव्याने सुरु झालेल्या रस्त्याचा वापर केला. मात्र, अगदी साडेअकराच्या ठोक्याला सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वार बंद केले. अगदी काही सेकंदावर असलेल्या वाहनचालकांनाही आतमधून जाऊ देण्यास सुरक्षारक्षकांनी मज्जाव करीत वाद घातल्याची वाहनचालकांची तक्रार आहे.

वाहनचालकांना वेळ पडतो अपुरा

व्हिएनआयटीच्या प्रवेशद्वारातून सकाळी ९.३० ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते ७ असे दोन-दोन तास वाहतूक सुरु करण्यास व्हिएनआयटीने परवानगी दिली. मात्र, अंबाझरीतील वाहनांची कोंडी लक्षात घेता केवळ दोन तास वेळ अपुरी आहे. त्यामुळे ही वेळ वाढवून देण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत. मात्र, या मागणीला प्रशासन गांभीर्याने घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – नदी, नाले सरकारी संपत्ती, नागपुरात जमीन महसूल कायद्याचा भंग ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस उपायुक्तांचा समाजमाध्यमांवर संदेश

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश प्रसारित करून नागरिकांना आवाहन केले. आजपासून रस्ता सुरु झाला असून सामान्य नागरिकांनी रस्त्याचा वापर करावा, असा संदेश प्रसारित केला आहे.