- दानदात्यांप्रती विद्यापीठाची असहिष्णू वृत्ती
- (भाग – १)
विद्यापीठात सुवर्ण किंवा रौप्य पदके सुरू करणाऱ्या दानदात्यांना फरकाची रक्कम भरा किंवा दिलेली रक्कम परत घेऊन जाण्याचे फर्मान विद्यापीठाने सोडल्याने व्यथित झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी फरकाची रक्कम न देण्याचे किंवा विद्यापीठात असलेली रक्कम परत न घेण्याचे ठरवत विद्यापीठाच्या असहिष्णूतेवर रोष व्यक्त केला आहे.
विद्यापीठातच नव्हे तर कुठल्याही शैक्षणिक संस्थेत दानदाते गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पुरस्काराची रक्कम जमा करतात. तेव्हा कालानुरूप त्यात भर घालण्याची जबाबदारी त्या-त्या संस्थेची असते. मात्र, नागपूर विद्यापीठाने पुरस्काराच्या फरकाची रक्कम भरा अन्यथा दिलेली रक्कम परत घेऊन जाण्याची असहिष्णू भाषा करीत दानदात्यांचा अपमान केला आहे. त्यातून अनेक दानदाते दुखावले असून त्यांनी पुरस्काराची रक्कम न देण्याचे आणि विद्यापीठाकडून निधी परत न घेण्याचा मानस ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केला आहे.
नागपूर विद्यापीठाची स्थापना १९२३ मध्ये झाली. तेव्हाच्या परिस्थितीनुसार कुणी ५ हजार, कुणी १० तर कुणी २० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम देणगी स्वरूपात देऊन आई, वडील किंवा इतर नातेवाईकांच्या नावाने सुवर्ण किंवा रौप्य पदके विद्यार्थ्यांना देण्याची विनंती विद्यापीठाला केली होती. त्यानुसार विद्यापीठाने पुरस्कार सुरू केले आणि आजतागायत विद्यापीठ ते देत आले आहे. त्यासाठी त्या त्या विद्याशाखेत सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जाहीर कौतुक सोहळा पदवीप्रदान समारंभाच्या रूपात पार पाडला जातो. मात्र विद्यापीठाला दानदात्यांच्या रकमेत सुवर्ण किंवा रौप्य पदके देणे परवडत नसल्याने अडचण झाली आहे. सध्या विद्यापीठ नियमानुसार सुवर्ण पदकासाठी ७५ हजार, रौप्य पदकासाठी ५० हजार देणगी घेण्यात येते. त्यामुळे ज्यांनी पूर्वी ५ हजार किंवा २० हजार देऊन विद्यापीठात सुवर्ण किंवा रौप्य पदके सुरू केली, अशांनी फरकाची रक्कम तीन महिन्याच्या आत जमा करण्याचे फर्मान विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकाऱ्यांनी सोडले आहे.
जवळपास २०० दानदात्यांना पत्र पाठवले असून विद्यापीठाच्या नियमानुसार सुवर्णपदकासाठी ७५ हजार आणि रौप्यपदक किंवा पारितोषिकासाठी ५० हजार देणगी घेण्यात येते. विद्यापीठाने पाठवलेल्या पत्रांवर काही दानदात्यांनी प्रतिसाद दिला असून जवळपास २० ते २५ दानदात्यांनी विद्यापीठाला फरकाची रक्कम देऊ केली आहे. काहींनी देण्यास नकार दिला आहे.
– डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखाधिकारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
विद्यापीठाने दीन होऊन अशाप्रकारे दानदात्यांना रक्कम मागणे अतिशय त्रासदायक आहे. अनेक दानदात्यांचा मृत्यू झाला आहे. अनेकांची पैसे देण्याची परिस्थिती नाही. सोन्या-चांदीचे भाव आताच वाढले का? त्यामुळे सुवर्णपदक किंवा रौप्यपदक तयार करणे विद्यापीठाला जमत नाही. सुमारे ९४ वर्षांच्या विद्यापीठाला सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी दानदात्यांनी दिलेल्या रकमेत भर घालता येऊ नये, ही अतिशय लाजिरवाणी बाब असून विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही.
– एक दानदाता