नागपूर : मागील काही काळापासून काही साहित्यिकांकडून सरकार व प्रशासनाविरोधात भूमिका घेतली जात आहे. मात्र, आणीबाणीच्या काळात काँग्रेसने संविधानाची हत्या केली. त्या कठीण काळात साहित्यिक व इतिहासकारांनी मौन का साधले, असा सवाल भाजप नेते आणि माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केला.
आणीबाणीला ५० वर्ष झाल्यानिमित्त भाजपच्या वतीने संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सहस्त्रबुद्धे बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, माजी खासदार अजय संचेती उपस्थित होते.
सहस्त्रबुद्धे म्हणाले, अलाहाबाद उच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना दोषी ठरवल्यानंतर काँग्रेस पक्षातील त्यांची घराणेशाही टिकवण्यासाठीच त्यांनी देशात आणीबाणी लादली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर समविचारी संघटनांनी आणीबाणीचा विरोध केला होता. १ लाख ३० हजारांच्यावर लोकांना तुरुंगात डांबण्यात आले. संविधानाच्या मुद्यावर आमच्यावर विरोधकांकडून तथ्यहीन टीका करण्यात येते. मात्र, याचा अर्थ आम्ही बचावात्मक पवित्रा घेतला, असा होत नाही हेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत धर्मपाल मेश्राम, गिरीश व्यास, प्रा. संजय भेंडे उपस्थित होते.
घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्यांनी शिकवू नये
काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आणीबाणीसंदर्भात केलेले आरोप निराधार आहेत. आणीबाणीत आम्ही अशी टीका केली असती, तर ती छापली देखील गेली नसती. त्यामुळे खर्गे यांच्या टीकेला उत्तर देण्याची गरज नाही. घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असे, सहस्त्रबुद्धे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंचा विरोध होता?
संघावरील बंदी उठवल्यावर मार्च १९७७ मध्ये तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली. दादर रेल्वे स्टेशनवर त्यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आले होते. एका बाळासाहेबांचे स्वागत दुसऱ्या बाळासाहेबांनी करू नये असे बंधन नाही, असे त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे त्यांचाही आणीबाणीला विरोध होता, असा किस्साही सहस्त्रबुद्धे यांनी सांगितला.