नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे निलंबित कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या चौकशीला न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांना राजीनामा मागितला. त्यांनी तो देण्यास नकार दिला. राज्यपालांच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने चौधरी यांनी पुन्हा कुलगुरूपदाची सुत्रे स्वीकारली. पण त्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्यांदा चौधरींना निलंबित केले. सध्या त्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी सुरू आहे. यानंतर आता कल्पना पांडे यांनी शिक्षण मंचाचे पदाधिकारी, प्राध्यापक आणि काही सामाजिक संघटनांसह चौधरींचा बचाव करण्यासाठी दंड थोपटले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी डॉ. चौधरी निर्दाेष असून महाराष्ट्र ज्ञान महामंडळासोबत (एमकेसीएल) झालेल्या विद्यापीठाच्या करारासंदर्भात काही मुद्दे पुढे करून त्यांना कशापद्धतीने फसवले जात आहे याची माहिती दिली. यावेळी सामाजिक संघटनांनी बहुजन समाजातील व्यक्तीला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे, असा आरोपही केला. पत्रकार परिषदेला ओबीसी महासंघासह, कुणबी समाज संघटनेसह अन्य सामाजिक संघटनांचे पदाधिकारी होते. वरवर हे सर्व प्रकरण विद्यापीठातील असले तरी आरोपकर्त्या कल्पना पांडे या भाजपच्या माजी महापौर आहेत आणि त्यांनी ज्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली त्यात भाजपच्या विद्यमान आमदाराचा आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. डॉ. पांडे यांचे आरोप काय? ‘एमकेसीएल’ कंपनीला कुलगुरू चौधरींनी विद्यापीठाचे काम देण्यावरून आरोप करण्यात आले आहेत. मात्र विष्णू चांगदे आणि आमदार प्रवीण दटकेंनी गादारोळ केलेल्या याच ‘एमकेसीएल’च्या एका वरिष्ठ संचालकाला विद्यापीठाने ‘जीवन साधना’ पुरस्कार देऊन ऑगस्ट २०२४ रोजी गौरविले असा आरोप पांडे यांनी केला. ‘एमकेसीएल’बाबत शासनाने डॉ. आत्राम आणि अन्य दोन प्राध्यापकांची चौकशी समिती स्थापित केली होती. डॉ. आत्राम समितीने चौकशीअंती दिलेल्या निर्णयात ‘एमकेसीएल’ला दिलेले काम नियमानुसार झाले असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, आत्राम समितीचा अहवाल लपवण्यात आला. यानंतर चौकशीसाठी नेमण्यात आलेली बाविस्कर समिती वैयक्तिक आकसातून असल्याचे दिसून येते. व्यवस्थापन परिषदेकडून या गोष्टींची तपासणी करण्यासाठी अजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. तिचा अहवालही डॉ. आत्राम समितीप्रमाणेच आहे. त्यावर समय बन्सोड यांचीही स्वाक्षरी आहे. त्यामुळे प्रवीण दटके, समय बन्सोड, विष्णू चांगदे, शिवानी दाणी या सर्वांनी डॉ. चौधरी निर्दोष असल्याचे माहिती असतानाही त्यांनी खोटी माहिती पसरवून विद्यापीठाची बदनामी केल्याचा आरोप केला व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी डॉ. पांडे यांनी केली. हेही वाचा - विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन गणवेशाविना? भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्यांकडे विद्यापीठाचा प्रभार कसा? सध्या नागपूर विद्यापीठाचा प्रभार हा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे आहे. बोकारे यांनी गोंडवाना विद्यापीठात झालेल्या प्राध्यापक भरतीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण न्यायालयातही सुरू आहे. असे असतानाही त्यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा प्रभार का देण्यात आला? असा प्रश्न डॉ. पांडे यांनी यावेळी केला. यामध्ये दटके, चांगदे आणि बन्सोड यांचे षडयंत्र असल्याचा आरोपही केला. गुन्हा दाखल करण्याची मागणी का केली? हे एका मोठ्या षडयंत्राचे बळी ठरल्याचा आरोप करीत भाजप आमदार प्रवीण दटके, राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य समय बन्सोड, भाजप संघटन मंत्री विष्णू चांगदे, भाजयुमोच्या महामंत्री शिवानी दाणी या सगळ्यांनी कुलगुरूंविरुद्ध खोटी माहिती पसरवून विद्यापीठाची बदणामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विद्यापीठ शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांनी केली. माजी महापौर आणि भाजप परिवारातील डॉ. पांडे यांनी स्वपक्षीयांविरुद्धच एल्गार पुकारल्याने शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हेही वाचा - अल्पसंख्याक आयोगाला नोकरी संदर्भातील आदेश देण्याचा अधिकार नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा " यामध्ये आमचे कुठलेही राजकारण किंवा राजकीय हेतू नाही. उलट काही लोकांच्या घाणेरड्या राजकारणामुळे विद्यापीठाची बदनामी होत असून विद्यार्थ्यांवर चुकीचा परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी म्हणून आम्ही सगळे समोर आलो आहोत. " - डॉ. कल्पना पांडे, अध्यक्ष, विद्यापीठ शिक्षण मंच.