नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्राचा अनभिषीक्त सम्राट ‘सीएम’ उर्फ ‘छोटा मटका’ याचे आयुष्य आता कायमचे जेरबंद झाले आहे. त्याची डरकाळी आता जंगलात ऐकू येणार नाही, तर ती आता पिंजऱ्यातच ऐकावी लागणार आहे. शुक्रवारी रात्री या वाघाला नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रात आणण्यात आले. दरम्यान, त्यांच्या या अवस्थेसाठी जबाबदार असणाऱ्या पशुवैद्यकांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत कारवाई होणार का, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला आहे.

मे महिन्यात बुद्धपोर्णिमेच्या दिवशी या वाघाची ताडोबा बफरमधील ‘ब्रम्हा’ या वाघाशी झुंज झाली होती. यात ‘ब्रम्हा’चा मृत्यू झाला, तर ‘छोटा मटका’ गंभीर जखमी झाला. त्याचवेळी वन्यजीवप्रेमींनी त्याच्यावर उपचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. मात्र, ताडोबातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरुन खात्यातील अधिकारीसुद्धा ‘तो’ नैसर्गिकरित्या ठीक होईल, हेच शेवटपर्यंत सांगत राहीले.

महिनाभरानंतरही तो एक पाय टेकवू शकत नाही, हे दिसून आल्यानंतर ‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्त दिले. त्यानंतर वनखात्याने त्यावर उपचार केल्याचा देखावा केला. प्रत्यक्षात त्याला दुखणे कमी होण्याचे औषध दिल्याचे सांगण्यात येते. या ‘पेनकिलर’मुळे काही काळ त्याने पाय टेकवला, पण नंतर पुन्हा तो तीन पायावरच चालताना दिसून आला. त्याच्या प्रकृतीचे गांभीर्य वाढत चालल्याचे स्पष्टपणे दिसून येत असताना देखील कोट्यावधीचा महसूल मिळवून देणाऱ्या या वाघाकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी पुन्हा एकदा ‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने याची दखल घेत स्वत:हून याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयीन कारवाई टाळण्यासाठी वनखात्याची धडपड सुरू झाली. या वाघाला उपचारासाठी जेरबंद करण्यात आले. नागपूर येथून तज्ज्ञ पशुवैद्यकाची चमू त्याच्या तपासणीसाठी दाखल झाली. या तपासणीतून त्याच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर असल्याने आणि त्याचे तीन सुळे तुटल्याचे दिसून आले. एवढेच नाही तर त्याच्या पंजाची नखे देखील अस्ताव्यस्त झाली होती.

या तपासणी अहवालानंतर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या वाघाविषयीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. त्याला फ्रॅक्चर असल्याचे सारेच ओरडून सांगत असतानाही ताडोबातील पशुवैद्यकाला हे दिसून आले नाही का? अधिकारी या पशुवैद्यकावरच अवलंबून का राहीले? त्याचवेळी नागपूर येथील तज्ज्ञ पशुवैद्यकाची मदत का घेण्यात आली नाही? राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण वाघाला नैसर्गिकरित्याच जगू देण्यास सांगते, पण वृद्ध वाघाच्या बाबतत हे ठीक आहे. तरुण वाघ जखमी असेल तर त्याला आठ दिवस जंगलातच त्यावर लक्ष ठेवून त्यानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत नसेल, तर त्याच्यावर उपचार केले जाऊ शकतात. मध्यप्रदेशसारखे राज्य या गोष्टी करत असताना महाराष्ट्राचा वनविभाग फक्त पर्यटनावर भर देण्यासाठीच आहे का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत.

नागपुरातील तज्ज्ञ पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी त्याचे सुरुवातीचे व्हिडिओ पाहीले त्याचवेळी त्याला फ्रॅक्चर असल्याचे निदान केले होते. त्यावेळी त्याला उपचरा मिळाले असते, तर कदाचित आज हा वाघ पुन्हा त्याच्या साम्राज्यात परतला असता. मात्र, पशुवैद्यक अधिकाऱ्यासाठी ताडोबा व्यवस्थापनाचा या वाघाबाबतचा हलगर्जीपणामुळे या वाघाचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. त्याला कायमचा बंदिवास समोर आला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता देखील कमीच आहे. वन्यजीवप्रेमींनी मात्र, त्याच्या या स्थितीसाठी जबाबदार असणाऱ्या ताडोबा व्यवस्थापनावर रोष व्यक्त केला आहे. ताडोबाच्या बफर क्षेत्रातील हा अनभिषिक्त सम्राट कायमचा जेरबंद झाल्याचे पाहून ते खूपच भावनिक झाले आहेत.