नागपूर : उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यानंतर उनाडक्या करण्याची संधी सोडणार नाही तर ती मुले कसली ! परीक्षा कधी संपतेय आणि कधी त्या अभ्यासाच्या गराड्यातून मुक्त होत सुट्यांचा आनंद लुटतो असे मुलांना होऊन जाते. येथे त्यांना शाळा नाही, त्यांना शिक्षक नाही, परीक्षा नाही आणि त्यामुळे सुट्यांचा तर प्रश्नच नाही. मात्र, निसर्ग हाच त्यांचा शिक्षक आणि निसर्गाच्याच छत्रछायेखाली ते आयुष्याचे शिक्षण घेत असतात. यावेळी त्यांच्यावर ना कोणते दडपण असते, ना आणखी काही. म्हणूनच ते कायम आनंदी असतात. टिपेश्वरच्या जंगलात ‘आर्ची’ नामक वाघिणीच्या बछड्यांचा निसर्गाच्या सानिध्यात मस्ती करतानाचा अतिशय सुंदर व्हिडिओ वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक येवतकर यांनी टिपलाय.

ही ‘आर्ची’ सैराट चित्रपटातील अभिनेत्री नाही, पण टिपेश्वरच्या जंगलाची ती सम्राज्ञी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अभिनेत्री ‘आर्ची’ने जेवढी अल्पावधीत तिची ‘फॅनफालोइंग’ तयार केली, त्याहीपेक्षा दुप्पट वेगाने ‘आर्ची’ या वाघिणीने पर्यटकांना वेड लावले आहे. तीच नाही तर तिच्या चारही बछड्यांची मोठी ‘फॅनफालाेइंग’ आहे. आता ते बछडे थोडे मोठे झाले आहेत. त्यामुळे आईच्या पायाशी न घुटमळता तिच्या आसपास राहूनच ते नाना करामती करत असतात. आता तर उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येणारे वाघ कायम पर्यटकांना दर्शन देतात. ‘आर्ची’चे बछडे देखील सातत्याने पर्यटकांना दर्शन देत असल्याने टिपेश्वरच्या जंगलाकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे.

मात्र, तेवढ्याच शिस्तबद्ध पद्धतीने या जंगलात पर्यटन सुरू आहे. वाघ दिसत आहेत म्हणून पर्यटकांचा गोंधळ नाही, तर नियंत्रित पर्यटनाचा नमूना टिपेश्वर अभयारण्यात पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “तोडीबाज म्‍हणून बच्चू कडूंची ओळख, त्‍यांनी…”, आमदार रवी राणा यांचा इशारा

काही दिवसांपूर्वी पर्यटक व वन्यजीव छायाचित्रकार सरफराज पठाण यांनी आईच्या पायाशी घुटमळत आपल्या अधिवासातून भ्रमंती करणाऱ्या ‘आर्ची’ च्या बछड्यांचा व्हिडिओ चित्रित केला. वन्यजीव अभ्यासक मीना जाधव यांनी तो ‘लोकसत्ता’ ला उपलब्ध करून दिला. तर त्याआधी विदेशातील वन्यजीव छायाचित्रकार मायकल स्टोन यांनी ‘आर्ची’ ही वाघीण तिच्या बछड्यांना निसर्गात सुरक्षित फिरतानाचे धडे देत असणारा व्हिडिओ चित्रित केला. टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटक मार्गदर्शक श्रीकांत सुरपान यांनी तो डेक्कन ड्रिफ्टचे वन्यजीव अभ्यासक पीयूष आकरे यांच्या मदतीने ‘लोकसत्ता’ला हा व्हिडिओ उपलब्ध करून दिला. या दोन्ही व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अभयारण्याचे उत्तम व्यवस्थापन वाघांसाठी चांगला अधिवास तयार करत आहे. हे ‘आर्ची’ आणि तिच्या बछड्यांचे सहज होणाऱ्या दर्शनावरून दिसून येत आहे.