ब्रोकोली, मशरुम, बेल पेपर्स, बेबी कॉर्नला पसंती; महिन्याला १५ लाखांची उलाढाल  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : भारतीय भाज्यांप्रमाणेच आता नागपूरकर विदेशी भाज्यांची चव चाखण्यात समोर निघाले आहेत. पावसाळ्यात आवक वाढल्याने विदेशी भाज्यांचे भाव आटोक्यात असल्याने त्यांच्या मागणीत वाढ  झाली आहे. बडय़ा हॉटेलसोबतच आता गृहिणींचा कलदेखील विदेशी भाज्यांकडे वाढला आहे. नागपुरात विदेशी भाज्यांची महिन्याला १५ लाखांची उलाढाल होत आहे.

आयटी कंपनीत काम करणाऱ्या युवकांची वाढती संख्या आणि जंकफूड, फास्टफूडसोबतच पंचतारांकित हॉटेलमध्ये तयार होणाऱ्या खाद्यपदार्थासाठी नागपुरात विदेशी भाज्यांची मागणी नेहमीच असते. पूर्वी विदेशातून येणारी भाजी हल्ली भारतातच उत्पादित केल्या जात आहे. उटी,बंगळुरू, दिल्ली, नाशिक येथून नागपुरात या भाज्या येत असून काही भाज्यांची लागवड नागपूर जिल्ह्यातही होत आहे. या भाज्यांमध्ये कॅलरीज् कमी असल्याने आरोग्यासाठी अनेक जण त्यांची खरेदी करू लागले आहेत. सलाद आणि चायनिजसोबतच क्वांटिनेंटल खाद्यपदार्थामध्ये प्रामुख्याने विदेशी भाज्यांचा उपयोग होतो. बडय़ा हॉटलेमध्ये दररोज शंभर किलोच्यावर या विविध प्रकारच्या भाज्यांचा पुरवठा होत असून आता मात्र सर्वसामन्य गृहिणी देखील त्या खरेदी करत आहे. मार्च ते जुलै या महिन्यात या भाज्यांचे भाव परवडणारे नसतात. मात्र पावसाळा आणि हिवाळ्यात या भाज्यांचे दर कमी होत असल्याने नागपुरात त्यांची मागणी वाढली आहे. विदेशी भाज्या दररोज विविध राज्यांतून रेल्वे मार्गाने नागपुरात येत असून प्रमुख विक्रेत्यांकडून त्या विदर्भातील इतर जिल्ह्यात रस्ते मार्गे पाठवण्यात येतात.  वेगवेगळ्या रंगाच्या ढोबळ्या मिरच्या, रेड व यलो कॅपसीकम, बेबीकॉर्न,स्वीट कॉर्न, ब्रोकोली, मशरुम्स, जांभळी पत्ताकोबी, आइसबर्ग लेटयुस, बेल पेपर्स,चेरी टोमॅटो या भाज्यांना शहरात नेहमीच मागणी असते. यासोबतच मटार (स्नो पीज्), अ‍ॅस्पॅरॅगस, आर्टीचोक, जालापेनो मिरच्या, झुकीनी (काकडी) या भाज्यांही नागपूरकरांमध्ये हळूहळू लोकप्रिय होत आहे. स्नो पीज सारख्या भाज्या तर दोनशे ग्रामला सुमारे नव्वद रुपये अशा दराने मिळतात.  या भाज्यांच्या महिन्याच्या उलाढालीत ७५ टक्के वाटा हा हॉटेल व्यावसायिकांचा आहे. सर्व विदेशी भाज्यांची किंमती शंभर ते अडीशे रुपयांच्या दरम्यान आहे. तर काही भाज्या या साडेआठशे ते हजार रुपये प्रतिकिलो दरम्यान आहेत. २५ प्रकारच्या विदेशी भाज्या सध्या नागपूरच्या बाजारात उपलब्ध आहेत.

नागपुरात गेल्या पाच वर्षांत विदेशी भाज्यांबाबत जनजागृती होऊन आणि त्यांचे आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे लोकांना कळल्याने  मागणी वाढली आहे. पूर्वी याच भाज्या विदेशातून येत होत्या. मात्र आता भारतात याची लागवड होते. या ७५ भाज्या टक्के खरेदी करणारा हॉटेल वर्ग आहे. किमती कमी झाल्याने गृहिणीदेखील आता या भाज्या विकत घेत आहेत.

– अंजली मंत्री, विदेशी भाज्यांचे ठोक विक्रेते बर्डी

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpurkar fascinates by foreign vegetable zws
First published on: 17-09-2019 at 01:11 IST