नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपलेच, तरीही नागपूरची ही अवस्था का…? माजी मंत्री तथा आमदार नितीन राऊत यांनी उपराजधानीतील दुरावस्थेचा पाढा वाचला. पावसाळी अधिवेशन संपले असले तरीही त्यांनी केलेली प्रश्नांची सरबत्ती चांगलीच गाजत आहे.

नागपूर शहराला आपण विकासाचे शहर म्हणतो, पण अलीकडची अतिवृष्टी असो किंवा नुकताच जाहीर झालेला स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल पाहता हे खरोखरंच विकासाचे शहर आहे का, हा प्रश्न पडतो. खुद्द भाजपच्या आमदारांनी जे महापौर राहिले आहेत, त्यांनीच या शहराच्या अवस्थेवर कोरडे ओढले आहेत. अतिशय दयनीय अशी या शहराची अवस्था झालेली आहे. माजी महापौर व आमदार संदीप जोशी यांनी काही दिवसांपूर्वीच शहराच्या स्वच्छता यंत्रणेतील अपयशाचा पाढा वाचला होता.

नागपूर महापालिका देवाच्या भरवश्यावर चालली आहे, असे तेच म्हणाले होते. त्यांच्यानंतर माजी महापौर व आमदार प्रवीण दटके यांनीही शहरातील नालेसफाईकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळेच शहर तुंबत असल्याची टिका केली होती. विरोधकांची टिका एकवेळ मान्य, पण आता सत्ताधारीच महापौर राहिलेले या शहराचे दोन्ही आमदार महापालिकेच्या अपयशावर शिक्कामोर्तब करत आहे. त्यामुळे या शहराचा ‘स्मार्टनेस’ हरवला आहे, हेच स्पष्ट होते. नागपूर स्मार्ट सिटीचा डंका पिटणाऱ्या भाजपच्या नेतृत्त्वाखालीच नागपूर शहर आज अंधारात, चिखलात, खड्ड्यांमध्ये आणि प्रशासनाच्या उदासीनतेत भरडले जात आहे.

इतकाच शहराचा विकास झाला असेल तर घरात पाणी कसे शिरते. या विकासाचा पैसा गेला कुठे, याची राज्यशासन चौकशी करणार आहे का? २०२३ मध्ये शहरातील नागनदी आणि पिवळ्या नदीला वैनगंगा आणि गोदावरीचे स्वरुप आले होते. शहरात त्यावेळी बोटी चालल्या. २०२४ मध्येही तीच पुनरावृत्ती झाली आणि आता २०२५ मध्येही तेच झाले.

तीन दिवसाच्या पावसात शहर तुंबले. घराघरात पाणी गेले. अवघ्या अर्ध्या तासात शहरातील रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले. आता तर स्वच्छ सर्वेक्षणात शहराच्या स्वच्छतेबाबत केलेले दावे उघडे पडले. मग हाच शहराचा विकास म्हणायचा का? शहराच्या विकासाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयाची उधळण म्हणजे आर्थिक घोटाळा नाही का, अशी प्रश्नांची सरबत्ती नितीन राऊत यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शहराचीच ही दुर्दशा असेल, तर मग इतर शहरांची काय अवस्था असेल, असेही नितीन राऊत म्हणाले.