भंडारा : भंडाऱ्यात रविवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना घडली, मात्र प्रशासनाला त्याचे काहीच गांभीर्य नाही. मग, हे प्रकरण दाबण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या आयोजकांवर आणि संबंधितांवर ताबडतोब गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
भंडाऱ्यात जनसंवाद यात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. रविवारी दहीहंडी कार्यक्रमाप्रसंगी घडलेली घटना अत्यंत दुर्वैवी आहे. मात्र, त्याहून दुर्दैवी आहे ते प्रशासनाला या घटनेचे गांभीर्य नसणे. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर आणि आयोजकांवर ताबडतोब गुन्हे दाखल व्हायला हवे होते. कारण कायद्यासमोर कुणी लहान, कुणी मोठे नसते. पोलीस प्रशासन जर या प्रकरणात कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असेल किंवा कोणतीही कारवाई होणार नसेल तर आम्ही पोलीस प्रशासनाला या प्रकरणात कारवाई करण्यासाठी बाध्य करू, अशी ग्वाही पटोले यांनी यावेळी दिली.
हेही वाचा – …अन् माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांगलेच भारावले! नेमकं काय घडलं? वाचा…
नाना पटोले यांच्याप्रमाणेच नेटकऱ्यांनीसुद्धा आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. आता तरी पोलीस अधीक्षक कर्तव्यदक्षता दाखवतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.