यवतमाळ : पाच राज्य पालथे घालून पूर्णपणे बरे झालेल्या सात मनोरुग्णांचे यशस्वी पुनर्वसन करण्यात नंददीप फाऊंडेशनला यश आले आहे. यासाठी सुमारे चार हजार ९०० किलोमीटर प्रवासाचा टप्पा संस्थेचे स्वयंसेवक निशांत सायरे, स्वप्नील सावळे तसेच कार्तिक भेंडे या तीन तरुणांनी गाठला. त्यांनी १९ ते २५ जून अशा सात दिवसांच्या अथक प्रवासातून खडतर अशी पुनर्वसनाची मोहीम फत्ते केली.

बलराम कोडोपी (४५) रा. डुमरीकोट, छत्तीसगढ, सुवासिनी सेठ (६८) , रा. पैकबहाल, सुवर्णपूर, ओडिसा, रेंगटी नागसेन (६५) रायगड, छत्तीसगड, गुरु लकरा (४२) रा.राजरंगपूर, लिपलोई, ओडिसा, मुरारी गंजू (६५) रा. मंधनीया, चतरा, झारखंड, चांदतारा (३८) रा. सरपतीपूर ग्राम, प्रयागराज, उत्तरप्रदेश तसेच जनार्धन महतो (३५) रा. शिवनगर कॉलनी, मुंगेर, बिहार अशी पुनर्वसित करण्यात आलेल्या प्रभुजींची नावे आहेत. मागील दीड ते दोन वर्षांपासून ही मंडळी मनोरुग्णसेवक संदीप व नंदिनी शिंदे दाम्पत्याच्या समर्थवाडी येथील नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात उपचाराधीन होती. त्यांच्यावर मेंदुरोग तज्ज्ञ डॉ.श्रीकांत मेश्राम यांचे मानसोपचार चालले तर डॉ. प्रवीण राखुंडे व डॉ.कविता करोडदेव यांनी त्यांच्या शारीरिक दुखण्यावर औषधोपचार केले.

या दरम्यान त्यांच्यात सकारात्मक बदल दिसून आल्यानंतर संस्थेने त्यांचे त्यांच्या कुटुंबीयांकडे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुनर्वसन स्वयंसेवक निशांत सायरे, स्वप्नील सावळे तसेच कार्तिक भेंडे या तरुणांनी सात दिवसांमध्ये पाच राज्यांचा धांडोळा घेऊन त्यांना कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. पुढील उपचार तसेच त्यांच्याशी कसे वागावे, याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना ‘सायको एज्युकेशन’ देण्यात आले. या मोहिमेच्या प्रवास खर्चासाठी हातभार म्हणून अनेकांनी आर्थिक मदतही केली. नारकुंड कामठवाडा येथील स्वप्नील रमेश सावळे व रुई येथील कार्तिक गुणवंत भेंडे हे दोन शेतकरी पुत्र प्रभुजींच्या पुनर्वसन प्रक्रियेत स्वेच्छेने आपला सहभाग नोंदवितात. या मोहिमेत आलेल्या संकटांचा त्यांनी ध्येर्याने सामना केला. हे दोघेही महात्मा जोतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात पदयुत्तर शिक्षण घेत आहे. कुठल्याही शासकीय अनुदानाशिवाय ‘नंददीप’ने लोकचळवळीच्या माध्यमातून हे पुनर्वसन यशस्वी केले आहे.

स्मशानभूमीत मुक्काम, आळीपाळीने जागरण

प्रवासाच्या पहिल्या दिवशी स्वयंसेवकांना छत्तीसगढ राज्यातील डुमरीकोट येथे मुक्काम करावा लागला. येथे ओळखीचे कुणीही नव्हते. ओढावलेल्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांना येथील स्मशानभूमीतच रात्र काढावी लागली. मनोरुग्णांच्या सुरक्षेसाठी तीन स्वयंसेवकांनी अधूनमधून झोपेची डुलकी घेत आळीपाळीने जागरण केले.रोटरी क्लब व रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन यवतमाळच्या पुढाकाराने मिळालेल्या रुग्णवाहिकेतून त्यांनी काही नक्षलगस्त भागातून सुमारे पाच हजार किलोमीटरचा प्रवास केला. यामध्ये त्यांनी छत्तीसगड आणि ओडिसा राज्यात प्रत्येकी दोन तर झारखंड, बिहार व उत्तरप्रदेश या राज्यात प्रत्येकी एकाचे पुनर्वसन केले आहे.