अकोला : बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे भव्य दिव्य नंगारा वास्तू संग्रहालय उभारण्यात आले आहे. बंजारा समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या संग्रहालयाचे ५ ऑक्टोबर २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले होते. सर्वसामान्य नागरिकांसाठी मात्र तब्बल सहा महिन्यानंतर आजपासून ते खुले झाले. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बंजारा समाजाची गठ्ठा मतपेढी लक्षात घेऊन संग्रहालयाचे तांत्रिक काम अपूर्ण असतानाच पंतप्रधानांच्या हस्ते संग्रहालयाचे लोकार्पण उरकण्यात आले होते. आता त्याचे काम पूर्ण झाल्याने पर्यटकांसाठी ते खुले केले.
वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा समाजाची संस्कृतीचे संवर्धन होऊन त्याचे दर्शन सर्वांना घडण्यासाठी राज्य शासनाने नंगारा आकाराची भव्य-दिव्य वास्तू साकारली. त्यामध्ये बंजारा समाजाचा वारसा देखावे, चलचित्र आणि संगीताच्या संयोजनातून डोळ्यासमोर उभा केला. या संग्रहालयाचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी ५ ऑक्टोबर २०२४ ला केले. संग्रहालयाच्या आतील तांत्रिक कार्य अपूर्ण असतांनाच त्याचे लोकार्पण उरकण्यात आले होते. त्यामागे राज्यातील विधानसभा निवडणुका हा मुख्य उद्देश होता, असे जाणकार सांगतात. संग्रहालयातील तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन त्यावेळी ते सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले केले नव्हते. लोकार्पणानंतर त्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर बरोबर सहा महिन्यानंतर ५ एप्रिलपासून ही वास्तू सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली झाली.
संग्रहालयात पर्यटकांसाठी ‘ऑडिओ गाईड’
‘बणजारा विरासत’ संग्रहालयाची संपूर्ण पाहणी करण्यासाठी सुमारे दोन तासांचा कालावधी लागतो. प्रत्येकाला ‘ऑडिओ गाईड’ म्हणून हेडफोन देण्यात येणार आहे. पर्यटक ज्या देखाव्यासमोर उभा आहे, त्या देखाव्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. बंजारा शब्दाची उत्पत्ती, बंजारा समाजाचे ऐतिहासिक संदर्भ, बंजारा समाजातील न्यायव्यवस्था, धार्मिक अधिष्ठान, पेहराव, राजकीय परंपरा याचे दर्शन वेगवेगळ्या दालनांमधून घडते. भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि शीख यांच्या देखाव्यातून धार्मिक सलोख्याचे वास्तव चित्रण स्पष्ट होते.
निवडणूक आणि भूमिपूजन-लोकार्पणाचे कनेक्शन
राज्यातील युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नंगारा वास्तू संग्रहालयाला मंजुरी मिळाली होती. डिसेंबर २०१८ मध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये नंगारा भवनाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर अपूर्ण काम असतांनाही नंगारा भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑक्टोबरला लोकार्पण झाले. सहा महिन्यानंतर आता ते सर्वसामान्यांसाठी खुले केले.