नागपूर : महापालिकेच्या रुग्णालयांत रुग्णांच्या २५ ते ३० प्रकारच्या चाचण्या करण्यात येतात. परंतु, महापालिकेने जिल्हा खनिज निधीतून मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतर एकूण सहा केंद्रात आता अत्याधुनिक ‘डायग्नोस्टिक हेल्थकेअर किओस्क’ यंत्र उपलब्ध केले आहे. त्यामुळे येथे नागरिकांना ६५ हून अधिक अद्ययावत चाचण्या नि:शुल्क मिळणार आहे. शहरातील या केंद्राबाबत आपण जाणून घेऊ या.
मानेवाडा केंद्राचे लोकार्पण गुरूवारी आमदार मोहन मते यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मानेवाडा केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनल पटले, माजी नगरसेविका मंगला खेकरे, मयकर इनोव्हेशन प्रा. लि.चे अभिषेक मयकर, मार्केटिंग आणि सेल्स प्रमुख पूजा गुप्ता आदी उपस्थित होते. या अद्ययावत यंत्रामुळे सहा केंद्रात उपचाराला येणाऱ्या गरीबांना आरोग्याशी संबंधित महागड्या चाचण्या काही मिनिटात निःशुल्क मिळतील, असे मते म्हणाले. या केंद्रांमध्ये यंत्र उपलब्ध करण्यासाठी मते यांनी महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर खासगी पॅथॉलॉजी लॅब मधील तपासणी अहवाल आणि ‘किओस्क’ यंत्रावरील समानता तपासल्यानंतरच या यंत्राचा मार्ग मोकळा झाला. या प्रकल्पामुळे सहा केंद्रातील अद्ययावत यंत्रावर शहरातील अतिजोखमीच्या रुग्णांची देखील तपासणी केली जाईल, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.
अद्यावत यंत्र कार्यान्वित झालेले शहरातील केंद्र
महापालिकेच्या मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासोबतच दिघोरी, नंदनवन, बिडीपेठ, सोमवारी क्वाटर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इंदिरा गांधी रुग्णालय येथे देखील ‘डायग्नोस्टिक हेल्थकेअर किओस्क’ हे अद्यावत यंत्र उपलब्ध करण्यात आले आहे. या ‘किओस्क’च्या संचालनासाठी प्रत्येक केंद्रावर प्रशिक्षित तंत्रज्ञाची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
चाचण्यांचे निदान काही मिनिटात
मयकर इनोव्हेशन प्रा. लि.चे अभिषेक मयकर म्हणाले, हे यंत्र ६५ हून अधिक चाचण्यांचे निदान काही मिनिटात करू शकते. यंत्र व्यवस्थापनामध्ये १२- एलईडी ईसीजी, डिजिटल स्टेथोस्कोप, डर्मास्कोप, ऑटोस्कोप, एएनसी कॅमेरा आणि वेब कॅमेरा आहे. या माध्यमातून टेलिकन्सल्टेशन आणि लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग देखील करण्याची सुविधा आहे. यंत्रामध्ये एचबीसी, मधुमेह, थायरॉईड, एचआयव्ही, युरीन टेस्ट, किडनी टेस्ट, युरिक ॲसिड, कोव्हिड, हापेटाइट्स आणि गर्भधारणा चाचण्यासह इतर अशा ६५ पेक्षा अधिक चाचण्या करणे शक्य असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.